You are currently viewing Shri Guru Charitra Adhyay 8 – श्री गुरुचरित्र अध्याय आठ

Shri Guru Charitra Adhyay 8 – श्री गुरुचरित्र अध्याय आठ

श्री गुरु चरित्र परयाण का यह आठवां अध्याय है श्री गुरु चरित्र में कुल 53 अध्याय हैं आप इन्हें एक एक कर पाठ करे सभी आधाय का लिंक नीचे दिया गया है.

श्रीगणेशाय नमः ॥
॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

नामधारक म्हणे सिद्धासी । गोकर्णमहिमा निरोपिलासी ।
श्रीगुरु राहिले किती दिवसीं । वर्तलें पुढें काय सांग ॥ १ ॥

तूं गुरुमूर्ति कृपासिंधु । माझे मनीं लागला वेधु ।
चरित्र ऐकतां महानंदु । अत्योल्हास होतसे ॥ २ ॥

परिसोनि शिष्याचें वचन । संतोषे सिद्ध अतिगहन ।
सांगता जाहला विस्तारुन । श्रोते तुम्ही अवधारा ॥ ३ ॥

गोकर्णक्षेत्रीं श्रीपाद यति । राहिले वर्षे तीन गुप्तीं ।
तेथोनि श्रीगिरिपर्वता येती । लोकानुग्रहासी ॥ ४ ॥

जयाचें चरणदर्शन करितां जाण । समस्त तीर्थांसमान ।
‘ चरणं पवित्रं विततं पुराणं ‘ । वेदश्रुति बोलती ॥ ५ ॥

समस्त तीर्थे गुरुचरणीं । तो कां हिंडे तीर्थभुवनीं ।
लोकानुग्रह करणें म्हणोनि । जाती आपण परियेसा ॥ ६ ॥

मास चारी क्रमोनि तेथें । आले निवृत्तिसंगमातें ।
दर्शन द्यावया भक्तलोकांतें । पातले तया कुरवपुरा ॥ ७ ॥

कुरवपुर महाक्षेत्र । कृष्णा-गंगा वाहे तीर ।
महिमा सांगतां असे अपार । भूमंडळांत दुर्लभ ॥ ८ ॥

तेथील महिमा सांगतां विस्तार होईल बहु कथा ।
पुढें असे अखिल चरित । सांगेन ऐक एकचित्ते ॥ ९ ॥

श्रीपाद राहिले कुरवपुरीं । ख्याति जाहली भूमीवरी ।
प्रगट महिमा अपरांपरी । सांगतां विस्तार असे देखा ॥ १० ॥

जे जन भजती भक्तीसीं । सौख्य पावती अप्रयासीं ।
लक्ष्मी-कन्या-पुत्रेंसी । जें जें चिंतिलें पावती ॥ ११ ॥

समस्त महिमा सांगावयासी । विस्तार होईल बहुवसीं ।
नामधारका परियेसीं । सांगेन किंचित् तुज आतां ॥ १२ ॥

पुढें अवतार व्हावया गति । सांगेन ऐका एकचित्तीं ।
श्रीपाद कुरवपुरीं असती । कार्यकारण पुढें असे ॥ १३ ॥

अवतार व्हावया कारण । सांगेन त्याचें पूर्वकथन ।
वेदशास्रसंपन्न । ब्राह्मण होता तया ग्रामीं ॥ १४ ॥

त्याची भार्या होती एक । नाम तियेचें ‘ अंबिका ‘ ।
सुशील आचार पतिसेवका । महापुण्यसती देखा ॥ १५ ॥

तितें पुत्र होऊनि मरती । पूर्वकर्मफळ-अर्जितीं ।
अनेक तीर्थव्रत-आचरतीं । तिणें केलीं परियेसा ॥ १६ ॥

ऐसे असता होणार गति । पुत्र जाहला मंदमति ।
माता स्नेह करी प्रीतीं । अपूर्व आपणासी म्हणोनि ॥ १७ ॥

वर्धतां मातापित्याघरीं । विप्रात्मज वाढला अति प्रीतिकरीं ।
व्रतबंध करिती कुळाचारीं । वेदाभ्यासीं घालावया ॥ १८ ॥

विद्या न ये तया कुमरा । मंदमति अज्ञान बहिरा ।
चिंता वाढे त्या द्विजवरा । म्हणे पुत्र मंदमति ॥ १९ ॥

अनेक देव आराधोनि । पुत्र लाधलों कष्टोनि ।
प्राचीन कर्म न सुटे म्हणोनि । चिंता करी अहोरात्र ॥ २० ॥

अनेकपरी शिकवी त्यासी । ताडण करी बहुवसीं ।
दुःख होय त्या जननीसी । वर्जी आपुले पतीतें ॥ २१ ॥

पतीसी म्हणे ते नारी । पुत्र नाही आमुचे घरीं ।
कष्टेंकरुनि नानापरी । पोशिले एका बाळकासी ॥ २२ ॥

विद्या न ये वेद त्यासी । वायां मारुनि कां कष्टसी ।
प्राचीन कर्म असे त्यासी । मूर्ख होऊनि उपजावें ॥ २३ ॥

आता जरी तुम्ही यासी । ताडन कराल अहर्निशीं ।
प्राण त्यजीन हा भरवंसीं । म्हणोनि बोले पतीसी ॥ २४ ॥

स्रियेचे वचन ऐकोनि । विप्र राहिला निश्र्चिंत मनीं ।
ऐसा काळ क्रमोनि । होते तया ग्रामांत ॥ २५ ॥

वर्तता पुढें तया स्थानीं । विप्र पडला असमाधानीं ।
दैववशेंकरुनि । पंचत्व पावला परियेसा ॥ २६ ॥

पुत्रासहित ते नारी । होती तेथें कुरवपुरीं ।
याचूनि आपुलें उदर भरी । जीवित्व करी येणेंपरी ॥ २७ ॥

विप्रस्रियेचा कुमर देखा । विवाहायोग्य जाहला निका ।
निंदा करिती सकळ लोक । मतिहीन म्हणोनियां ॥ २८ ॥

कन्या न देती त्यासी कोणी । समस्त करिती दूषणी ।
म्हणती शुष्क वाहें कां पाणी । उदर भरी येणें विधीं ॥ २९ ॥

समस्त ब्राह्मण म्हणती त्यासी । ” दगडापरी जन्मलासी ।
लांछन आणिलें वंशासी । अरे मूर्खा कुलनाशका ॥ ३० ॥

तुझ्या पितयाचा आचार । ख्याति असे चारी राष्ट्र ।
जाणे वेद धर्म शास्त्र । त्याचे पोटीं तूं जन्मलासी ॥ ३१ ॥

बोल आणिला तूं पितयासी । घातले पितृव्य अधोगतीसी ।
भिक्षा मागोनि उदर भरिसी । लाज नये कैसी तुज ॥ ३२ ॥

जन्मोनि तूं संसारीं । काय करावें पशुत्वापरी ।
अथवा गंगाप्रवेश करी । जन्मोनि वायां ” म्हनती लोक ॥ ३३ ॥

ऐसें ऐकोनि ब्रह्मचारी । दुःख करी नानापरी ।
मातेसि म्हणतसे अवसरीं । प्राण त्यजीन आपुला ॥ ३४ ॥

निंदा करिती सकळ मज । असोनि देह कवण काज ।
पोसूं न शकें माते तुज । जाईन अरण्यवासासी ॥ ३५ ॥

ऐकोनि पुत्राचे वचन । माता करी अति चिंतन ।
शोक करी अतिगहन । प्रलापितसे ते नारी ॥ ३६ ॥

माता सुत दुःख करीत । गेलीं गंगाप्रवाहांत ।
तेथें देखिले जगद्भरित । श्रीपाद यति स्नान करितां ॥ ३७ ॥

जाऊनि दोघें लागती चरणी । विनविती कर जोडुनि ।
वासना असे आमुचे मनीं । प्राण त्यजूं गंगेंत ॥ ३८ ॥

निरोप द्यावा जी आम्हांसी । सद्गति व्हावया कारणासी ।
आत्महत्या महादोषी । म्हणोनि विनवितों कृपासिंधु ॥ ३९ ॥

ऐकोनि विप्रस्रियेचें वचन । पुसती श्रीपाद कृपा करुन ।
काय संकटीं तुमचें मन । त्यजिणें प्राण कवण्या गुणें ॥ ४० ॥

विप्रस्री तये वेळां । सांगती जाहली दुःखा सकळा ।
म्हणे स्वामी भक्तवत्सला । तारावें आम्हां बाळकांसी ॥ ४१ ॥

पुत्राविणें कष्टलें भारी । अनेक तीर्थे पादचारी ।
केलीं व्रतें पूजा जरी । सकळही देव आराधिले ॥ ४२ ॥

व्रतें उपवास सांगूं किती । करितें झाले अपरिमिति ।
झाला पुत्र हा दुर्मति । निंदा करिती सकळ जन ॥ ४३ ॥

वेदशास्त्रसंपन्न । पति माझा ब्राह्मण ।
त्याचे पोटीं जन्मला हा हीन । मंदमति दुरात्मा ॥ ४४ ॥

कृपा करीं गा श्रीपाद यति । जन्मोजन्मी ऐसी गति ।
पुत्र न व्हावा मंदमति । ऐसा पदार्थ सांगा मज ॥ ४५ ॥

कृपासागर दैन्यहरण । म्हणोनि धरिले तुझे चरण ।
शरणागता करावया रक्षण । आलासि स्वामी कृपासिंधु ॥ ४६ ॥

जन्मोनियां संसारीं । कष्ट केले नानापरी ।
न देखेंचि सौख्यकुसरी । व्याले पुत्र न राहती ॥ ४७ ॥

वांचोनियां हा एक सुत । शेळीच्या गळां स्तन लोंबत ।
वृथा जन्म जाहला म्हणत । विनवीतसे श्रीगुरुसी ॥ ४८ ॥

देवा आतां ऐसे करणे । पुढील जन्मीं मनुष्यपणें ।
पूज्यमान पुत्र पावणें । जसा तूं पूज्य जगत्रयासी ॥ ४९ ॥

सकळ लोक त्यासि वंदिती । ऐसा पुत्र होणार गति ।
उपाव सांगा श्रीगुरु यति । म्हणोनि चरणीं लागली ॥ ५० ॥

श्रमातें उद्धारगति । नव्हे मागुती पुनरावृत्ति ।
पितरां सकळां स्वर्गप्राप्ति । लाधे ऐसें निरोपावें ॥ ५१ ॥

वासना असे माझ्या मनीं । पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी ।
बाळपणींच पाहेन नयनीं । पूज्यमान समस्तांसी ॥ ५२ ॥

श्रीपाद ऐकोनि तिचें वचन । सांगती भक्ति कृपा करुन ।
करीं वो ईश्र्वरआराधन । पुत्र होईल श्रीहरीऐसा ॥ ५३ ॥

गौळणीचे घरी देखा । कृष्ण उपजला जो कारणिका ।
व्रत केलें गौळणीं ऐका । ईश्र्वराची आराधना ॥ ५४ ॥

तैसा आराधीं तूं ईश्र्वर । पुत्र पावसी हा निर्धार ।
तुझ्या मनीं आशा भार । लाधसी म्हणती श्रीपाद यति ॥ ५५ ॥

विप्रस्री म्हणे तया वेळीं । व्रत कैसे केले ते गौळी ।
कैसा पूजिला चंद्रमौळी । विस्तारावें मजप्रति ॥ ५६ ॥

तैसेच व्रत करीन आपण । म्हणोनि लागतसे चरणा ।
कृपामूर्ति श्रीगुरुराणा । सांगता झाला तया वेळीं ॥ ५७ ॥

म्हणती श्रीपाद तियेसी । ईश्र्वर पूजीं वो तूं प्रदोषीं ।
मंदवारीं विशेषीं । पूजा करी भक्तिने ॥ ५८ ॥

पूजा देखिली गौळणीं । विस्तार असे स्कंदपुराणीं ।
सांगेन कथा ऐक सगुणी । म्हणती श्रीगुरु तियेसी ॥ ५९ ॥

ऐकोन श्रीगुरुचे वचना । संतोषली विप्रांगना ।
जाऊनि लागे श्रीगुरुचरणा । विनवीतसे तये वेळीं ॥ ६० ॥

विप्रस्री म्हणे स्वामियासी । अभिनव मातें निरोपिलेंसी ।
देखतां पूजा प्रदोषीं । पुत्र झाला कृष्णऐसा ॥ ६१ ॥

आपण केलिया पूजा जरी । फळ पावेन निर्धारीं ।
पूर्वी झालें कवणेपरी । विस्तारावे मज दातारा ॥ ६२ ॥

श्रीगुरु सांगती तियेसी । सांगेन ऐक एकचित्तेसीं ।
‘ उज्जनी ‘ नाम नगरीसी । जाहलें विचित्र परियेसा ॥ ६३ ॥

तया नगरीं ‘ चंद्रसेन ‘ । राजा होता धर्मज्ञ ।
त्याचा सखा असे प्राण । ‘ मणिभद्र ‘ म्हणोनि परियेसा ॥ ६४ ॥

सदा ईश्र्वरभक्ति करी । नानापरी पूजी अपारी ।
भोळा-देव प्रसन्न करी । दिधला चिंतामणि एक ॥ ६५ ॥

कोटिसूर्याचा प्रकाश । माणिक शोभे महासुरस ।
कंठी घाली सदा हर्ष । तया मणिभद्र सेनसख्यासी ॥ ६६ ॥

तया मण्याचे लक्षण । सुवर्ण होती लोह पाषाण ।
तेज फांके ज्यावरी जाण । कनक होय परियेसा ॥ ६७ ॥

जें जें चिंतीत मानसीं । तें तें पावे स्मरणेसीं ।
ऐशी ख्याति माणकासी । समस्त राजे कांक्षा करिती ॥ ६८ ॥

इष्टत्वे मागती कित्येक । मागों पाठविती तें माणिक ।
बलात्कारे घ्यावया देख । राजे वांछिती परियेसा ॥ ६९ ॥

म्हणती क्रय करुनि देखा । माणिक द्यावें आपणां ऐका ।
जरी न देसी स्वाभाविका । युद्धालागी येऊ म्हणती ॥ ७० ॥

राजे समस्त मिळोनि । पातले नगरा त्या उज्जनी ।
अपार सैन्य मिळवूनि क्षोणी । वेष्टिलें तया नगरासी ॥ ७१ ॥

ते दिनी शनिवार त्रयोदशी । राजा बैसला पूजेसी ।
शंका न धरी मानसीं । एकचित्तें पूजीतसे ॥ ७२ ॥

महाकाळेश्र्वरलिंगासी । पूजा करी राजा हर्षी ।
गौळिणी-कुमरें पहावयासी । आली तया शिवालया ॥ ७३ ॥

पूजा पाहूनि शिवाची । मुलें म्हणती गवळणींचीं ।
खेळूं चला आम्हीं ऐसेंचि । लिंग करुनि पूजूं आतां ॥ ७४ ॥

विनोदेकरुनि । आली आपुले गृहासंनिधानीं ।
एकवटोनि पाषाणीं । कल्पिलें तेथे शिवालय ॥ ७५ ॥

पाषाण एक करुनि लिंग । पूजा करिती बाळकें चांग ।
नानापरीची पत्री साङग । कल्पिती तेथें पूजेसी ॥ ७६ ॥

षोडशोपचारे पूजा कल्पिती । उदक नैवेद्य समर्पिती ।
ऐसे कौतुके खेळती । ते गोपकुमारक ॥ ७७ ॥

गोपिका स्रिया येउनि । पुत्रांतें नेती बोलावुनी ।
भोजन करावे म्हणोनि । गेलीं सकळ बाळकें ॥ ७८ ॥

त्यांतील एक गोपीसूनु । न जाय भुवना लिंग सोडून ।
त्याची माता जवळी येऊन । मारी आपुले पुत्रासी ॥ ७९ ॥

म्हणे कुमारा भोजनासी । चाल घरा जाहली निशी ।
कांही केलिया न वचे परियेसी । तो गोपीकुमारक ॥ ८० ॥

कोपेकरुनि ते गौळणी । मोडी पूजा-खेळ आंगणी ।
पाषाण दूरी टाकुनी । गेली आपुले मंदिरासी ॥ ८१ ॥

पूजा मोडितां बाळक । प्रलाप करीतसे तो अनेक ।
मूर्च्छा येऊनि क्षणएक । पडिला भूमी अवधारा ॥ ८२ ॥

लय लावूनि लिंगस्थानीं । प्राण त्यजूं पाहे निर्वाणी ।
प्रसन्न झाला तो शूलपाणी । तया गोपीसुताला ॥ ८३ ॥

शिवालय रत्नखचित । सूर्यतेजें जैसे शोभित ।
लिंग दिसे रत्नखचित । जागृत झाला तो बाळक ॥ ८४ ॥

निजरुप धरुनि गौरीरमण । उठवी बाळका करीं धरुन ।
वर माग म्हणे मी प्रसन्न । जें वांछिसी तें देईन ॥ ८५ ॥

बाळकें विनविले ईश्र्वरासी । कोप न करावा मातेसी ।
पूजा मोडिली प्रदोषी । क्षमा करणें म्हणतसे ॥ ८६ ॥

ईश्र्वर भोळा-चक्रवर्ती । वर दिधला बहुतप्रीतीं ।
” प्रदोषसमयीं पूजा देखती । गौळणी होय देवजननी ॥ ८७ ॥

तिच्या पोटीं होईल सुत । तोचि विष्णुअवतार विख्यात ।
न करी पूजा वहिली म्हणत । पोषील आपुले पुत्रापरी ॥ ८८ ॥

जें जें मनीं तूं इच्छिसी । पावेल वेगी धरी मानसीं ।
अखिल सौख्य तुझिया वंशी । पुत्रपौत्रीं नांदाल ॥ ८९ ॥

प्रसन्न होवोनि गिरिजापती । गेले लिंगालयीं गुप्ती ।
शिवालय राहिलें रत्नखचिती । गौळियाघरी तयाचपरी ॥ ९० ॥

कोटिसूर्याचा प्रकाश । शिवालय दिसे सुरस ।
लोक म्हणती काय प्रकाश । उदय झाला दिनकरा ॥ ९१ ॥

आले होते परराष्ट्र-राजे । विस्मय करिती महाचोजें ।
द्वेष सांडूनि बोलती वोजे । भेटो म्हणती रायासी ॥ ९२ ॥

पहा हो पवित्र नगरांत । सूर्य झाला असे उदित ।
राजा असेल पुण्यवंत । ऐसियांसी काय विरोध ॥ ९३ ॥

म्हणोनि पाठविती सेवकासी । भेटूं म्हणती प्रीतीसीं ।
राजा बोलावी तयांसी । आपुलें गृहीं नगरांत ॥ ९४ ॥

इतुके होतां तें अवसरीं । राजा पुसतो प्रीतीकरी ।
रात्रि असतां अंधकारी । उदय जाहला केवीं सूर्य ॥ ९५ ॥

राजे चंद्रसेनासहित । पाहावया येती कवतुकार्थ ।
दिसे विचित्र रत्नखचित । शिवालय अनुपम्य ॥ ९६ ॥

तेणेचि परी गौळ्याचे सदन । विराजमान अतिगहन ।
पुसता झाला राजा आपण । तया गौळियाकुमारकासी ॥ ९७ ॥

सांगितला सर्व वृत्तांत । संतोष करिती राजे समस्त ।
गौळियां राजा तूं होई म्हणत । देती नानादेशसंपदा ॥ ९८ ॥

निघोनि गेले राजे सकळ । राहिला चंद्रसेन निर्मळ ।
शनिप्रदोष पूजा फळ । भय कैचे तया नरा ॥ ९९ ॥

गौळिकुमर जाय घरा । मातेसी सांगे सविस्तरा ।
” येईल पुढें तुझ्या उदरा । नारायण अवतरोनि ॥ १०० ॥

ऐसा ईश्र्वरे दिधला वर । संशय न धरीं निर्धार ।
प्रसन्न जाहला कर्पूरगौर । देखिली पूजा प्रदोषींची ॥ १०१ ॥

मोडिलीस प्रदोषपूजा म्हणोनि । म्यां मागितलें त्या शूलपाणी ।
क्षमा करुनि घेतलें ” म्हणोनि । सांगे वृत्तांत मातेसी ॥ १०२ ॥

ऐसा ईश्र्वर प्रसन्न झाला । प्रदोषपूजा ऐसे फळ ।
श्रीपाद सांगती तये वेळा । तया विप्रस्रियेसी ॥ १०३ ॥

तुझे मनी असेल जरी । होईल पुत्र मजसरी ।
संशय सांडूनि निर्धारीं । शनिप्रदोषीं पूजी शंभु ॥ १०४ ॥

ऐसे म्हणोनि श्रीपादरावो । चक्रवर्ती-भोळा देवो ।
विप्रस्रियेचा पाहोनि भावो । प्रसन्न होत तया वेळीं ॥ १०५ ॥

बोलावूनि तिचे कुमारकासी । हस्त ठेविती मस्तकेसी ।
ज्ञान जाहलें तत्काळेसी । त्रिवेदी झाला शास्त्रज्ञ ॥ १०६ ॥

वेदशास्त्रादि तर्क-भाषा । म्हणता झाला अतिप्रकाशा ।
विस्मय झाला असमसहासा । विप्र म्हणती अति आश्र्चर्य ॥ १०७ ॥

विस्मय करोनि विप्रवनिता । म्हणे ईश्र्वर निश्र्चित ।
कार्याकारण अवतार होत । आला नरदेह धरोनि ॥ १०८ ॥

पूर्वजन्मीचें पुण्यार्जित । जोडलें हें निश्र्चित ।
जो भेटला श्रीगुरुनाथ । म्हणोनि नमिलें क्षणक्षणां ॥ १०९ ॥

म्हणे ईश्र्वर तूंचि होसी । पूजा करीन मी तुज प्रदोषीं ।
मिथ्या नव्हे तुझिया वाक्यासी । पुत्र व्हावा तुजऐसा ॥ ११० ॥

ऐसा निश्र्चय करोनि । पूजा करी ती नित्य येऊनि ।
प्रदोषपूजा अतिगहनी । करी श्रीपादरायासी ॥ १११ ॥

पुत्र झाला तिचा महाज्ञानी । वेदशास्त्रसंपन्नी ।
पूज्य जाहला अति गहनी । सर्वांहूनि अधिकता ॥ ११२ ॥

विवाह झाला मग तयासी । पुत्रपौत्रीं नांदे हर्षी ।
श्रीगुरुकृपा होय ज्यासी । ऐसे होय अवधारा ॥ ११३ ॥

ऐसा श्रीगुरु कृपावंत । भक्तजना असे रक्षित ।
ऐक शिष्या एकचित्त । नामधारका श्रीमंता ॥ ११४ ॥

नामधारक भक्तासी । सांगे सिद्ध वेस्तारेसीं ।
परियेसा समस्त भक्त हर्षी । म्हणे सरस्वती-गंगाधरु ॥ ११५ ॥

॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने
सिद्धनामधारकसंवादे शनिप्रदोषव्रतमाहात्म्यकथनं नाम अष्टमोऽध्यायः

॥ श्रीनरसिंहसरस्वतीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

Leave a Reply