You are currently viewing Shri Guru Charitra Adhyay 7 – श्री गुरुचरित्र अध्याय सातवां

Shri Guru Charitra Adhyay 7 – श्री गुरुचरित्र अध्याय सातवां

श्री गुरु चरित्र परयाण का यह सातवांअध्याय है श्री गुरु चरित्र में कुल 53 अध्याय हैं आप इन्हें एक एक कर पाठ करे सभी आधाय का लिंक नीचे दिया गया है.

श्री गुरुचरित्र अध्याय सातवां

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

नामधारक म्हणे सिद्धासी । गोकर्णीचा महिमा आम्हांसी ।
विस्तार करावा कृपेसी । पूर्वी कवणा वर जाहला ॥ १ ॥

समस्त तीर्थे सोडुनी । श्रीपाद गेले किंकारणी ।
पूर्वी आराधना केली कवणी । पुराण कथा सांग मज ॥ २ ॥

ज्यावरी असेल गुरुची प्रीति । तीर्थ महिमा ऐकणे चित्ती ।
वांछा होतसे ज्ञानज्योती । कृपामूर्ति सिद्धराया ॥ ३ ॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । गोकर्णमहिमा मज पुससी ।
सांगेन तुज विस्तारेसी । एकचित्ते ऐकावे ॥ ४ ॥

पूर्वयुगान्तरी इक्ष्वाकुवंशी । मित्रसह राजा परियेसीं ।
प्रतापवंत क्षत्रियवंशी । सर्वधर्मरत देखा ॥ ५ ॥

राजा सकळशास्त्रज्ञ । विवेकी असे श्रुतिनिपुण ।
बलाढ्य शूर महाभिज्ञ । नित्योद्दोगी दयानिधि ॥ ६ ॥

असतां राजा एके दिवशीं । विनोदें निघाला पारधीसी ।
प्रवेश जाहला अरण्यासी । वास सिंह-शार्दूलां ॥ ७ ॥

निर्मनुष्य अरण्यांत । राजा पारधी खेळत ।
भेटला तेथे दैत्य अद्भुत । ज्वाळाकार भयानक ॥ ८ ॥

राजा देखोनि तयासी । शरजाळ वर्षे कोपेसी ।
मूर्छना येऊनि धरणीसी । पडिला दैत्य तये वेळीं ॥ ९ ॥

दैत्य वधितां तये वेळीं । होता त्याचा बंधु जवळी ।
आक्रंदतसे प्रबळी । बंधुशोकें करोनियां ॥ १० ॥

प्राण त्यजितां निशाचरु । बंधूसी म्हणे येरु ।
तूं जरी होसील सहोदरु । सूड माझा घ्यावा ॥ ११ ॥

ऐसें बोलुनि बंधूसी । दैत्य पावला पंचत्वासी ।
अनेक माया तयापाशीं । नररुप धरिलें तया वेळीं ॥ १२ ॥

रुप धरुनि मानवाचे । सौम्य वाणी बोले वाचें ।
सेवक जाहला राजयाचा । अतिनम्रत्वें बोलोनियां ॥ १३ ॥

सेवा करी नानापरी । जैसे स्वामीचें मनोहरी ।
ऐसें क्वचित् दिवसवरी । वनांतरीं राजा होता ॥ १४ ॥

समस्त मृग मारुनि । दुष्ट जीव छेदोनि ।
राजा आला परतोनि । आपुले नगरा परियेसा ॥ १५ ॥

ऐसे क्रमितां एके दिवशी । पितृश्राद्ध आलें परियेसीं ।
आमंत्रण सांगे त्या ऋषींसी । वसिष्ठादि मुनिवरां ॥ १६ ॥

ते दिनी नियमें स्वयंपाक । करवी राजा सविवेक ।
कपटी होता जो सेवक । तया स्थानीं ठेविला ॥ १७ ॥

राजा म्हणे त्यासी । पाकस्थानीं तू वससी ।
जें जें मागतील माणवसीं । सर्व आणूनि त्वां द्यावें ॥ १८ ॥

अंगीकारोनि तो सेवक । नरमांस आणोनि देख ।
कापट्यभावें करवी पाक । केली शाक तया वेळीं ॥ १९ ॥

ठाय घालितां ऋषेश्र्वरांसी । पहिलेंच वाढिलें नरमांसासी ।
पाहतांचि कोपला वसिष्ठ ऋषि । दिधला शाप तये वेळीं ॥ २० ॥

वसिष्ठ म्हणे रायास । नरमांस वाढिलें आम्हांस ।
त्वरित हो गा ब्रह्मराक्षस । म्हणोनि कोपे तयावेळीं ॥ २१ ॥

शाप देतांचि तयेवेळीं । राजा कोपला अति प्रबळी ।
अपराध नसतां आम्हांजवळी । वायां शापिलेति कां ॥ २२ ॥

नेणें मांसपाक कवणें केला । माझा निरोप नाहीं झाला ।
वृथा आमुतें शाप दिधला । आपण शापीन म्हणतसे ॥ २३ ॥

उदक घेऊनि अंजुळीं । शापावया सिद्ध झाला तये काळी ।
तंव राजस्त्री येऊनि जवळी । वर्जिती जाहली पतीसी ॥ २४ ॥

पतीसी म्हणे ते नारी । गुरुसी शापितां दोष भारी ।
वंदूनि त्याचे चरण धरीं । तेणें तरशील भवसागर ॥ २५ ॥

‘ मदयंती ‘ सतीचे वचन । मानिता झाला राजा आपण ।
अंजुळीं उदक होतें जाण । पाडिलेम आपुले चरणावरी ॥ २६ ॥

शाप देता कल्मषपाणी । पडलें राजयाचे चरणीं ।
‘ कल्माषपाद ‘ नाम म्हणोनि । ब्रह्मराक्षस झाला तो राव ॥ २७ ॥

पतिव्रता राजमहिषी । लागली वसिष्ठचरणांसी ।
उद्धरी स्वामी बाळकासी । एवढा कोप काय कीजे ॥ २८ ॥

करुणावचन ऐकोनि । शांत झाला वसिष्ठ मुनि ।
वर्षें बारा क्रमोनि । पुनरपि राजा होईल ॥ २९ ॥

उःशाप देऊनि वसिष्ठ ऋषि । गेला आपुले ठायासी ।
ब्रह्मराक्षस राजा परियेसीं । होउनी गेला वनांतरा ॥ ३० ॥

निर्मनुष्य अरण्यांत । राक्षस राहिला प्रख्यात ।
भक्षण करी अनेक जंत । पशुपक्षिमनुष्यादिकरुन ॥ ३१ ॥

ऐसें क्रमितां तये वनीं । मार्गस्थ दंपत्यें दोनी ।
ब्राह्मणजाती मार्ग क्रमूनि । देखिला राक्षस भयासुर ॥ ३२ ॥

येऊनि धरिलें ब्राह्मणासी । व्याघ्र जैसा पशूसी ।
घेऊनि गेला भक्षावयासी । विप्रस्त्री जाय समागमे ॥ ३३ ॥

अतिशोक करीतसे ते ब्राह्मणी । जाऊनि लागे राक्षसाचरणी ।
राखे मजला अहेवपणीं । प्राणेश्र्वरासी सोडी पां ॥ ३४ ॥

न भक्षी माझा पति । माझी प्राणेश्र्वरी प्रीति ।
माते भक्षीं गा सुखवृत्तीं । वल्लभातें सोडी पां ॥ ३५ ॥

पतीविणें राहती नारी । जन्म वृथा दगडापरी ।
पहिलें मातें स्वीकारी । प्राण राखे पतीचा ॥ ३६ ॥

अति लावण्य पूर्ववयेसीं । वेदशास्त्र-पारगासी ।
याचा प्राण तूं रक्षिसी । जगदूरक्षिलें पुण्य तुज ॥ ३७ ॥

कृपा करी गा आम्हांवरी । होईन तुझी कन्याकुमारी ।
मज पुत्र होतील जरी । नाम ठेवीन तुझेचि ॥ ३८॥

ऐसे नानापरी देखा । विप्रस्री करी महादुःखा ।
बोल न मानितां राक्षसे ऐका । त्या ब्राह्मणाते भक्षिले ॥ ३९ ॥

पतीसि भक्षिले देखोनि । शाप दिधला ते ब्रह्मणीं ।
म्हणे राक्षसा ऐक कानीं । शाप माझा एकचित्ते ॥ ४० ॥

तूं राजा सूर्यवंशी । शापास्तव राक्षस झालासी ।
पुढें-मागुतीं राजा होसी । द्वादश वर्षे क्रमोनियां ॥ ४१ ॥

परी रमतां तुवां स्रियेसवें । प्राण जाईल स्वभावें ।
आम्हां अनाथा भक्षिसी दुष्ट भावें । दुरात्मया तूं राक्षसा ॥ ४२ ॥

शाप देऊनि तये वेळीं । पतीच्या अस्थि मिळवूनि सकळी ।
काष्ठें घालूनियां प्रबळी । अग्निप्रवेश केला तिणें ॥ ४३ ॥

ऐसें असतां राजा देखा । क्रमिली तेथ बारा वर्षां ।
पुनरपि राजा होऊनि ऐका । आला आपुले नगरासी ॥ ४४ ॥

विप्रस्रियेचे शापवचन । स्रियेसी सांगे ते खूण ।
रतिसंगति करितांक्षण । मृत्यु असे आपणासी ॥ ४५ ॥

ऐकोनि पतीचे वचन । मदयंती दुःख करी आपण ।
मन करूनि निर्वाण । त्यजूं प्राण म्हणतसे ॥ ४६ ॥

मदयंती म्हणे रायासी । संतान नाहीं तुम्हांसी ।
आतां कष्टला बारा वर्षी । प्रारब्ध आपुले न चुकेचि ॥ ४७ ॥

ऐकोनि सतीचे वचन । शोक दाटला अतिगहन ।
बाष्पें निघती लोचनीं । केवी करु म्हणतसे ॥ ४८ ॥

मंत्रीवृद्धपुरोहितांसी । बोलाविता झाला परियेसीं ।
ब्रह्महत्या घडली आपणासीं । विमोचन होय कवणेपरीं ॥ ४९ ॥

मंत्री वृद्ध पुरोहित । रायासी म्हणती ऐक मात ।
तीर्थे आचरावीं समस्त । तेणे पुनीत होशील ॥ ५० ॥

ऐसा करोनि विचारु । राजा निघे तीर्थ आचरूं ।
सकळ तीर्थ परिकरु । विधिपूर्वक करीतसे ॥ ५१ ॥

जे जे तीर्था जाय आपण । अनेक पुण्य करी जाण ।
यज्ञादि कर्म, ब्राह्मण- । जना अन्नदान करीतसे ॥ ५२ ॥

ऐसी नाना तीर्थे करीत । ब्रह्महत्या सवे असे येत ।
अघोररुपें असे दिसत । नवचे कवणेपरी देखा ॥ ५३ ॥

कष्टोनि राजा बहुतांपरी । निर्वाण होऊनि मनाभितरीं ।
हिंडत पातला मिथिलापुरीं । चिंताक्रांत होऊनियां ॥ ५४ ॥

नगरा-बाह्य प्रदेशीं । श्रमोनि राजा परियेसीं ।
चिंतीतसे मानसीं । वृक्षच्छाये बैसोनियां ॥ ५५ ॥

तंव ऋषेश्र्वरांसमवेत । जैसा रुद्र प्रकाशित ।
गौतम-ऋषेश्र्वर ख्यात । अवचित तेथें पातला ॥ ५६ ॥

देखोनि राजा गौतमासी । चरणीं लोळे संतोषी ।
नमन करी अति हर्षी । भक्तिभावें करोनियां ॥ ५७ ॥

आश्र्वासूनि तये वेळीं । गौतम पुसे करुणा-बहाळी ।
क्षेमसमाधान सकळी । पुसता झाला वृतांत ॥ ५८ ॥

काय झाले तुझे राज्य । अरण्यवासी कवण काज ।
चिंताव्याकुळ मुखांबुज । कवण कार्य घडले असे ॥ ५९ ॥

ऐकोनि ऋषेश्र्वराचे वचन । राजा सांगे विस्तारोन ।
शाप जाहला ब्राह्मणवचन । ब्रह्महत्या घडली मज ॥ ६० ॥

प्रायश्र्चितादि सकळिक । यज्ञादि सर्व धर्मादिक ।
समस्त तीर्थे क्षेत्रें सुखे । आचरली आपण देखा ॥ ६१ ॥

शमन न होय माझा दोष । सवेंचि येतसे अघोर वेष ।
व्रते आचरलों कोटिश । न वचे दोष परियेसा ॥ ६२ ॥

आजि माझा सफळ जन्म । दर्शन झालें तुझे चरण ।
होतील माझे कष्ट निवारण । म्हणोनि चरणीं लागला ॥ ६३ ॥

ऐकोनि रायाचे वचन । करुणासागर गौतम आपण ।
भय सांडी गा निर्वाण वचन । तारील शंकर मृत्युंजय ॥ ६४ ॥

तुझे पापनिवारणासी । सांगेन तीर्थविशेषीं ।
महापातक संहारासी । गोकर्ण-म्हणिजे स्थान असे ॥ ६५ ॥

स्मरण करितां गोकर्णासी । ब्रह्महत्यादि पाप नाशी ।
ईश्र्वर तेथे सदा निवासी । मृत्युंजय सदाशिव ॥ ६६ ॥

जैसे कैलासीचें शिखर । अथवा मूर्धिमंदर ।
निश्र्चय वास कर्पूरगौर । गोकर्णक्षेत्री परियेसा ॥ ६७ ॥

रात्रि असतां अंधकारोनि । उजेड नव्हे त्या अग्नी ।
चंद्रोदये नव्हे निर्वाणी । तयाभास्करावांचून ॥ ६८ ॥

तैसे समस्त तीर्थानें । पापें न जाती त्याचे गुणें ।
सूर्योदयी तम हरणे । तैसे गोकर्णदर्शनमात्रें होय ॥ ६९ ॥

सहस्र ब्रह्महत्या जरी । घडल्या असतील या शरीरीं ।
प्रवेश होतां गोकर्णक्षेत्री । शुद्धात्मा होय परियेसा ॥ ७० ॥

इंद्रोपेंद्रविरिंचि देखा । जाऊनि तया स्थानी ऐका ।
तप केले हो सकळिका । काम्यसिद्धि व्हावया गति ॥ ७१ ॥

भक्तिपूर्वक तया स्थानीं । जप व्रत करिती जाण ।
फळ होय लक्षगुण । ऐसे पुण्यक्षेत्र असे ॥ ७२ ॥

जेथे ब्रह्मा विष्णु देखा । इंद्रादि देवगण सकळिकां ।
साध्य झाले तप ऐका । यावेगळे काय सांगूं ॥ ७३ ॥

जाणा तो साक्षात ईश्र्वर । गोकर्णक्षेत्र कैलासपुर ।
प्रतिष्ठा करी विघ्नेश्र्वर । विष्णुनिरोपें विनयार्थ ॥ ७४ ॥

समस्त देव तेथे येती । पुण्यक्षेत्रीं वास करिती ।
ब्रह्मा विष्णु इंद्रासहिती । विश्र्वेदेव मरुद्गण ॥ ७५ ॥

सूर्य-चंद्र-वसु आदिक । ‘ पूर्वद्वारीं ‘ राहिले ऐक ।
प्रीतिकरें भक्तिपूर्वक । वसताति तये स्थानीं ॥ ७६ ॥

अग्नि यम चित्रगुप्त । एकादश रुद्र पित्र ।
‘ दक्षिणद्वारीं ‘ वास करित । अति संतोषें राहिले असती ॥ ७७ ॥

वरुणादिसहित गगा सकळें । ‘ पश्र्चिमद्वारीं ‘ वास जाहले ।
प्रीतिकरीं चंद्रमौळे । वास केला परियेसा ॥ ७८ ॥

कुबेर वायु भद्रकाळी । मातृदेवता चंडी सकळी ।
‘ उत्तरद्वारीं ‘ वास त्रिकाळीं । पूजा करिती महाबळेश्र्वराची ॥ ७९ ॥

चित्ररथादि विश्र्वावसु । चित्रसेन गंधर्व सुरसु ।
पूजा करिती महेशु । सदा वसोनि तये ठायीं ॥ ८० ॥

घृताची रंभा मेनका । तिलोत्तमा उर्वशी ऐका ।
नित्य नृत्य करिती सुखा । महाबळेश्र्वरा सन्मुख ॥ ८१ ॥

वसिष्ठ कश्यप कण्व ऋषि । विश्र्वामित्र महातापसी ।
भरद्वाज जैमिनी जाबाल ऋषि । पूजा करिती सदा तेथें ॥ ८२ ॥

ऋतु अंगिरस ब्रह्मऋषि । आचार करिती महातापसी ।
महाबळेश्र्वराचे भक्तिसी । राहिले गोकर्णक्षेत्रांत ॥ ८३ ॥

मरीची नारद अत्रिऋषि । दक्षादि सकल ब्रह्म-मुनि परियेसीं ।
सनदादिक तापसी । उपनिषदाचें उपासिती ॥ ८४ ॥

अनेक सिद्ध साध्य जाण । मुनीश्र्वर अजिनधारण ।
दंडधारी संन्यासी निर्गुण । ब्रह्मचारी तेथें वसती ॥ ८५ ॥

त्वगस्थिमात्रशरीरेसीं । अनुष्ठिती महातापसी ।
पूजा करिती भक्तिसीं । चंद्रमौळीची परियेसा ॥ ८६ ॥

गंधर्वादि समस्त देव । पितर सिद्ध अष्टवसव ।
विद्याधर किंपुरुष सर्व । सेवेसी जाती निरंतर ॥ ८७ ॥

गुह्यक किन्नर स्वर्गलोक । शेषादि नाग तक्षक ।
पिशाच वेताळ सकळिक । जाती पूजे तया स्थानीं ॥ ८८ ॥

नाना श्रृंगार करुनि आपण । अनेक भूषणे विराजमान ।
सूर्यसंकाश विमान । वाहने येती देवगण ॥ ८९ ॥

स्तोत्रगायनें करिती देखा । नमिती नृत्य करिती अनेका ।
पूजेकारणे येती सकळिका । महाबळेश्र्वरलिंगापाशी ॥ ९० ॥

जे जे इच्छिती मनकामना । पावे त्वरित निर्धारे जाणा ।
समान नाही क्षेत्र गोकर्णा । या ब्रह्मांडगोलकांत ॥ ९१ ॥

अगस्त्यादि सनत्कुमार । प्रियव्रतादि राजकुमार ।
अग्निदेव कंदर्प येर । वर लाधले तया ठायीं ॥ ९२ ॥

शिशुमारी भद्रकाळी । पूजा करिती त्रिकाळीं ।
मणिनागातें गरुड न गिळी । महाबळेश्र्वरदर्शने ॥ ९३ ॥

रावणादि राक्षसकुळ । कुंभकर्ण येर सकळ ।
वर लाधले केवळ । बिभीषण पूजीतसे ॥ ९४ ॥

ऐसे समस्त देवकुळ । सिद्धदानवादि सकळ ।
गोकर्णक्षेत्रा जाऊनि प्रबळ । आराधिती नानापरी ॥ ९५ ॥

लिंग स्थापिती आपुले नामी । असंख्यात नामोनामीं ।
वर लाधले होते कामी । चतुर्विध पुरुषार्थ ॥ ९६ ॥

ब्रह्मा विष्णु आपण देखा । कार्तवीर्य विनायका ।
आपुले नामी लिंग ऐका । प्रतिष्ठा केली तये ठायी ॥ ९७ ॥

धर्मक्षेत्रपाळादि । दुर्गादिदेवशक्तिवृंदी ।
लिंग स्थापिती आपुले आदी । तया गोकर्णक्षेत्रांत ॥ ९८ ॥

गोकर्णक्षेत्र असे गहन । लिंग तीर्थे असंख्यात जाण ।
पदिपदी असती निर्गुण । ऐसे क्षेत्र अनुपम्य ॥ ९९ ॥

सांगो किती त्याची खूण । असंख्यात तीर्थे जाण ।
पाषाण समस्त लिंग सगुण । तीर्थ जाण समस्त उदकें ॥ १०० ॥

Leave a Reply