You are currently viewing Shri Guru Charitra Adhyay 51 – श्री गुरुचरित्र अध्याय इक्यावन

Shri Guru Charitra Adhyay 51 – श्री गुरुचरित्र अध्याय इक्यावन

श्री गुरु चरित्र परयाण का यह इक्यावनवाँ अध्याय है श्री गुरु चरित्र में कुल 53 अध्याय हैं आप इन्हें एक एक कर पाठ करे सभी आधाय का लिंक नीचे दिया गया है .

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्योः नमः ॥

नामधारक विनवी सिद्धासी । मागें कथा सांगितली आम्हांसी ।
म्लेंच्छराजानें श्रीगुरुसी । नेलें होतें नगरासी ॥ १ ॥

तेथूनि आले गाणगाभुवनासी । पुढील कथा सांगा आम्हांसी ।
करुणावचन-अमृतेंसी । श्रीगुरुचरित्र आद्यंत ॥ २ ॥

सिद्ध म्हणे ऐक वत्सा । कथा असे अतिविशेषा ।
ऐकतां जाती सकळ दोषा । चिंतिलें काम्य पाविजे ॥ ३ ॥

राजाची भेटी घेऊनि । श्रीगुरु आले गाणगाभुवनीं ।
योजना करिती आपुल्या मनीं । गौप्य रहावें म्हणोनियां ॥ ४ ॥

प्रगट झालों बहुवसी । राजा आला भेटावयासी ।
उपजली भक्ति म्लेंच्छासी । नाना याती येतील ॥ ५ ॥

म्हणोनि आतां गौप्य व्हावें । लौकिकमतें निघावें ।
पर्वतयात्रा म्हणोनि स्वभावें । निघाले श्रीगुरु परियेसा ॥ ६ ॥

गौप्य राहिले गाणगापुरीं । प्रकट दावणें लोकाचारी ।
निघाले स्वामी श्रीपर्वतगिरी । शिष्यांसहित अवधारा ॥ ७ ॥

भक्तजन बोळवीत । चिंता करिताति बहुत ।
श्रीगुरु त्यांसी संबोखित । राहविती अतिप्रीतीं ॥ ८ ॥

दुःख करिती सकळ जन । लागताति श्रीगुरुचरणा ।
स्वामी आमुतें सोडुन । केवीं जातां यतिराया ॥ ९ ॥

तूं भक्तजनांची कामधेनु । होतासी आमुचा निधानु ।
आम्हां बाळकां सोडून । जातां म्हणोन विनविताति ॥ १० ॥

नित्य तुझे दर्शनीं । दुरितें जातीं पळोनि ।
जे जे आमुची कामना मनीं । त्वरित पावे स्वामिया ॥ ११ ॥

बाळकांते सोडूनि माता । केवीं जाय अव्हेरिता ।
तूंचि आमुचा मातापिता । नको अव्हेरुं म्हणताति ॥ १२ ॥

ऐसें नानापरि विनविती । हांसते झाले श्रीगुरुमूर्ति ।
संबोखिती अतिप्रीतीं । न करावी चिंता म्हणोनि ॥ १३ ॥

आम्ही असतों याचि ग्रामीं । नित्य स्नान अमरजासंगमीं ।
वसों मठीं सदा प्रेमीं । गौप्यरुपें अवधारा ॥ १४ ॥

जे भक्त असती माझ्या प्रेमीं । त्यांसी प्रत्यक्ष दिसों आम्ही ।
लौकिकमतें आविद्युाधर्मी । जातो श्रीशैल्ययात्रेसि ॥ १५ ॥

प्रातःस्नान कृष्णातीरी । पंचनदी-संगम औदुंबरी ।
अनुष्ठान बरवें त्या क्षेत्रीं । माध्याह्नीं येतो भीमातटीं ॥ १६ ॥

संगमी स्नान करोनि । पूजा घेऊं मठीं निर्गुणी ।
चिंता न करा अंतःकरणी । म्हणोनि सांगती प्रीतिकरें ॥ १७ ॥

ऐसें सांगती समस्तांसी । अनुमान न धरा हो मानसीं ।
गाणगाभुवनीं अहर्निशीं । वसो आम्ही त्रिवाचा ॥ १८ ॥

जे जन भक्ति करिती । त्यांवरी आमुची अतिप्रीती ।
मनःकामना पावे त्वरिती । ध्रुव वाक्य असे आमुचें ॥ १९ ॥

अश्र्वत्थ नव्हे हा कल्पवृक्ष । संगमी असे प्रत्यक्ष ।
जें जें तुमच्या मनीं अपेक्ष । त्वरित साध्य पूजितां ॥ २० ॥

कल्पवृक्षातें पूजोन । यावें आमुचे जेथ स्थान ।
पादुका ठेवितों निर्गुण । पूजा करावी मनोभावें ॥ २१ ॥

विघ्नहर चिंतामणी । त्यांतें करावें अर्चनी ।
चिंतिलें फळ तत्क्षणीं । पावाल तुम्ही अवधारा ॥ २२ ॥

समस्त विघ्नांचा अंतक । पूजा तुम्हीं विनायक ।
अष्टतीर्थे असतीं विशेख । आचरावीं मनोभावें ॥ २३ ॥

संतोषकर आम्हांप्रती । त्रिकाळ करावी आरती ।
भक्तजन जें इच्छिती । त्वरित पावे परियेसा ॥ २४ ॥

ऐसें सांगोनि तयांसी । निघाले स्वामी श्रीपर्वतासी ।
भक्त परतोनि मठासी । आले चिंतीत मनांत ॥ २५ ॥

चिंतीत रिघती मठांत । तेथे दिसती श्रीगुरुनाथ ।
लोक झाले विस्मित । म्हणती वस्तु त्रिमूर्ति ॥ २६ ॥

यासी म्हणती जे नर । ते पावती यमपूर ।
सत्य जाणा हो निर्धार । न कळे महिमा आम्हांसी ॥ २७ ॥

सवेंचि पाहतां न दिसे कोणी । प्रेमळ भक्त देखती नयनीं ।
गौप्यरुप धरोनि । राहिले श्रीगुरु मठांत ॥ २८ ॥

दृष्टांत दाखवोनि भक्तांसी । पातले आपण श्रीपर्वतासी ।
पाताळगंगातीरासी । राहिले स्वामी परियेसा ॥ २९ ॥

शिष्यांतें निरोपिती अवधारा । पुष्पांचें आसन त्वरित करा ।
जाणें असे पैलतीरा । ऐक्य व्हावें मल्लिकार्जुनीं ॥ ३० ॥

निरोप देतां श्रीगुरुमूर्ती । आणिलीं पुष्पें सेवंती ।
कमळ कल्हार मालती । कर्दळीपर्ण वेष्टोनि ॥ ३१ ॥

आसन केले अतिविचित्र । घातलें गंगेमध्यें पवित्र ।
श्रीगुरु शिष्यां सांगत । जावें तुम्हीं ग्रामासी ॥ ३२ ॥

दुःख करिती सकळी । त्यांसी सांगती श्रीगुरु चंद्रमौळी ।
गाणगाग्रामीं असों जवळी । भाव न करावा दुजा तुम्हीं ॥ ३३ ॥

लौकिकमतें आम्ही जातों । ऐसें दृष्टांती दिसतों ।
भक्तजनां घरीं वसतों । निर्धार धरा मानसीं ॥ ३४ ॥

ऐेसें भक्तां संबोखोनि । उठले श्रीगुरु तेथूनि ।
पुष्पासनीं बैसोनि । निरोप देती भक्तांसी ॥ ३५ ॥

‘ कन्यागतीं ‘ बृहस्पतीसी । ‘ बहुधान्य ‘ नाम संवत्सरेसी ।
सूर्य चाले ‘ उत्तर-दिगंते ‘ सी । संक्रांति ‘ कुंभ ‘ परियेसा ॥ ३६ ॥

‘ शिशिर ‘ ऋतु , ‘ माघ ‘ मासीं । ‘ असित पक्ष ‘ , ‘ प्रतिपदे ‘ सी ।
‘ शुक्रवारीं ‘ पुण्यदिवशीं । श्रीगुरु बैसले निजानंदीं ॥ ३७ ॥

श्रीगुरु म्हणती शिष्यांसी । जातों आम्ही निज-मठासी ।
पावतां खूण तुम्हांसीं । प्रसादपुष्पें पाठवूं ॥ ३८ ॥

येतील पुष्पें शेवंती । घ्यावा प्रसाद तुम्हीं भक्तीं ।
पूजा करावी अखंडिती । लक्ष्मी वसो तुमच्या घरीं ॥ ३९ ॥

आणिक सांगेन एक खूण । गायनीं करावें माझें स्मरण ।
त्यांचे घरीं मी असें जाण । गायनीं प्रीति बहु मज ॥ ४० ॥

नित्य जे जन गायन करिती । त्यांवरी माझी अतिप्रीति ।
त्यांच्या घरीं अखंडिती । आपण असें अवधारा ॥ ४१ ॥

व्याधि नसती त्यांचे घरी । दरिद्र जाय त्वरित दूरी ।
पुत्रपौत्र-श्रियाकरीं । शतायुषी नांदतील ॥ ४२ ॥

ऐकती चरित्र माझें जरी । अथवा वाचिती जन निरंतरी ।
लक्ष्मी राहे त्यांचे घरीं । संदेह न धरावा मानसीं ॥ ४३ ॥

ऐसें सांगोनि शिष्यांसी । श्रीगुरु जहाले अदृश्येसी ।
चिंता करिती बहुवसी । अवलोकिताति गंगेंत ॥ ४४ ॥

ऐशी चिंता करितां थोर । तटाकीं आले नावेकर ।
तेही सांगती विचार । श्रीगुरु आम्हीं देखिले म्हणोनि ॥ ४५ ॥

शिष्यवर्गाचें मनोहर । व्यवस्था सांगती नावेकर ।
होतों आम्हीं पैलतीर । तेथें देखिले मुनीश्र्वरा ॥ ४६ ॥

संन्यासी वेष दंड हातीं । नाम ‘ नृसिंहसरस्वती ‘ ।
निरोप दिधला आम्हांप्रती । तुम्हां सांगिजे म्हणोनि ॥ ४७ ॥

आम्हां सांगितलें मुनीं । आपण जातों कर्दळीवनीं ।
सदा वसो गाणगाभुवनीं । ऐसें सांगा म्हणितलें ॥ ४८ ॥

भ्रांतपणें दुःख करितां । आम्ही देखिले दृष्टांता ।
जात होतें श्रीगुरुनाथ । सुवर्णपादुका त्यांचे चरणीं ॥ ४९ ॥

निरोप सांगितला तुम्हांसी । जावें आपुलाले स्थानासी ।
सुखी असावें वंशोवंशीं । माझी भक्ति करोनि ॥ ५० ॥

प्रसादपुष्पें आलिया । शिष्यें घ्यावीं काढोनियां ।
ऐसें आम्हां सांगोनियां । श्रीगुरु गेले अवधारा ॥ ५१ ॥

ऐसें नावेकरी सांगत । प्रसादपुष्पें वाट पहात ।
समस्त राहिले स्थिरचित्त । हर्षे असती निर्भर ॥ ५२ ॥

इतुकिया अवसरीं । प्रसादपुष्पें आलीं चारी ।
मुख्य शिष्य प्रीतिकरीं । काढोनि घेती अवधारीं ॥ ५३ ॥

नामधारक म्हणे सिद्धासी । मुख्य शिष्य ते कोण श्रीगुरुसी ।
विस्तारोनियां आम्हांसी । सांगा पुष्पें कोण लाधले ॥ ५४ ॥

सिद्ध म्हणे नामधारका । शिष्य बहुत गुरुनायका ।
गाणगापुरीं असतां ऐका । शिष्य गेले आश्रमासी ॥ ५५ ॥

आश्रम घेती संन्यासी । त्यांसी पाठविलें तीर्थासी ।
त्यांची नामें परियेसीं । सांगेन ऐकें विस्तारें ॥ ५६ ॥

कृष्ण-बाळसरस्वती । उपेंन्द्र-माधवसरस्वती ।
पाठविते झाले अतिप्रीतीं । आपण राहिलों समागमें ॥ ५७ ॥

गृहस्थधर्मे शिष्य बहुत । समस्त आपुले घरीं नांदत ।
त्रिवर्ग आले श्रीपर्वता । आपण होतों चवथावा ॥ ५८ ॥

साखरे नाम ‘ सायंदेव ‘ । कवीश्र्वर-युग्म पूर्व ।
‘ नंदी ‘ नामा, ‘ नरहरि ‘ देव । पुष्पें घेतलीं चतुर्वगीं ॥ ५९ ॥

श्रीगुरुप्रसाद घेऊन । आले शिष्य चौघेजण ।
तेंचि पुष्प माझें पूजनीं । म्हणोनि पुष्प दाखविलें ॥ ६० ॥

ऐसी श्रीगुरुची महिमा । सांगतां असे अनुपम्या ।
थोडें सांगितलें तुम्हां । अपार असे ऐकतां ॥ ६१ ॥

श्रीगुरुचरित्र कामधेनु । सांगितलें तुज विस्तारोनु ।
दरिद्र गेलें पळोनु । ऐसें जाण निर्धारीं ॥ ६२ ॥

ऐसें श्रीगुरुचें चरित्र । पुस्तक लिहिती जे पवित्र ।
अथवा वाचिती ऐकती श्रोत्र । लक्ष्मीवंत होती जाण ॥ ६३ ॥

धर्म-अर्थ-काम-मोक्ष । त्यासी साध्य होती प्रत्यक्ष ।
महानंद उभयपक्ष । पुत्रपौत्री नांदती ॥ ६४ ॥

ऐसें सिद्धें सांगितलें । नामधारक संतोषले ।
सकळाभीष्ट लाधलें । तात्काळिक अवधारा ॥ ६५ ॥

म्हणे सरस्वती-गंगाधर । नामधारक लाधला वर ।
लक्ष्मीवंत पुत्र-कुमर । शतायुषी श्रियायुक्त ॥ ६६ ॥

श्रीगुरुचरित्र ऐकतां । लाधली सकळाभीष्टता ।
याकारणें ऐका समस्त । श्रीगुरुचरित्र कामधेनु ॥ ६७ ॥

अमृताची असे माथणी । स्वीकारावी त्वरित सकळ जनीं ।
धर्मार्थ-काम-मोक्षसाधनीं । हेचि कथा ऐकावी ॥ ६८ ॥

पुत्रपौत्रीं ज्यासी चाड । त्यासी हे कथा असे गोड ।
लक्ष्मी राहे अखंड । श्रवण करी त्या प्राणियां-घरीं ॥ ६९ ॥

चतुर्विध पुरुषार्थ । लाधती श्रवणें परमार्थ ।
श्रीनृसिंहसरस्वती गुरुनाथ । रक्षी त्यांचे वंशोवंशी ॥ ७० ॥

म्हणोनि सरस्वती-गंगाधर । श्रोतयां करी नमस्कार ।
कथा ऐका मनोहर । सकळाभीष्ट लाधे तुम्हां ॥ ७१ ॥

॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे
श्रीगुरुनिजानंदगमनं नाम एकपंचाशत्तमोऽध्यायः ॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

Leave a Reply