You are currently viewing Shri Guru Charitra Adhyay 24 – श्री गुरुचरित्र अध्याय चौबीस

Shri Guru Charitra Adhyay 24 – श्री गुरुचरित्र अध्याय चौबीस

श्री गुरु चरित्र परयाण का यह चौबीसवां अध्याय है श्री गुरु चरित्र में कुल 53 अध्याय हैं आप इन्हें एक एक कर पाठ करे सभी आधाय का लिंक नीचे दिया गया है.

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
नामधारक म्हणे सिद्धासी । पुढे कथा वर्तली कैसी ।
विस्तारुनि आम्हांसी । निरोपावें दातारा ॥ १ ॥

शिष्यवचन परिसोनि । सांगते झाले सिद्ध मुनि ।
ऐक वत्सा नामकरणी । गुरुचरित्र अभिनव ॥ २ ॥

ऐसा त्रिविक्रम महामुनि । जो कां होता कुमसी-स्थानीं ।
निंदा करी आपुले मनीं । दांभिक संन्यासी हा म्हणत ॥ ३ ॥

ज्ञानवंत श्रीगुरुमूर्ति । विश्र्वाच्या मनींचे ओळखती ।
नराधिपासी सांगती । निंदा करितो म्हणोनि ॥ ४ ॥

श्रीगुरु म्हणती तये वेळी । निघावें आजचि तात्काळी ।
त्रिविक्रमभारतीजवळी । जाणें असे कुमसीसी ॥ ५ ॥

ऐकोनि राजा संतोषला । नाना अलंकार करिता जाहला ।
हस्ती-अश्र्व-पायदळा । श्रृंगारिलें तये वेळीं ॥ ६ ॥

समारंभ केला थोरु । आंदोळिकांत बैसवी श्रीगुरु ।
नानापरी वाजंतरें । गीतवाद्यसहित देखा ॥ ७ ॥

ऐसेपरी श्रीगुरुमूर्ति । तया कुमसी-ग्रामासी जाती ।
त्रिविक्रम महायति । करीत होता मानसपूजा ॥ ८ ॥

मानसपूजा नरहरीसी । नित्य करी भावेंसीं ।
स्थिर नव्हे तया दिवसीं । मानसीं मूर्ति नरकेसरीची ॥ ९ ॥

चिंता करी मनीं यति । कां पां न ये मूर्ति चित्तीं ।
वृथा जाहलें तपसामर्थी । काय करणें म्हणतसे ॥ १० ॥

बहुत काळ आराधिले । कां पां नरसिंहे उपेक्षिलें ।
तपफळ वृथा गेलें । म्हणोनि चिंती मनांत ॥ ११ ॥

इतुकें होता अवसरी । श्रीगुरुतें देखिले दूरी ।
येत होतें नदीतीरीं । मानसपूजेचे मूर्तिरुपें ॥ १२ ॥

सर्व दळ दंडधारी । तयांत एकरुप नरहरि ।
भारती देखोनि विस्मय करी । नमन करीत निघाला ॥ १३ ॥

साष्टांगी नमोनि । जाऊनि लागे श्रीगुरुचरणीं ।
सर्वचि रुपें झाला प्राणी । दंडधारी यतिरुप ॥ १४ ॥

समस्तरुप एकेपरी । दिसताति दंडधारी ।
कवण लघु कवण थोरी । न कळे तया त्रिविक्रमा ॥ १५ ॥

भ्रमित झाला तये वेळी । पुनरपि लागे चरणकमळी ।
ब्रह्मा-विष्णु-चंद्रमौळी । त्रिमूर्तिच तूंचि जगद्गुरु ॥ १६ ॥

न कळे तुझें स्वरुपज्ञान । अविद्यामाया वेष्टोन ।
निजस्वरुप होऊन । कृपा करणे स्वामिया ॥ १७ ॥

तुझें स्वरुप अवलोकितां । अशक्य आम्हां गुरुनाथा ।
चर्मचक्षूकरुनि आतां । पाहूं न शके म्हणतसे ॥ १८ ॥

तूं व्यापक सर्वां भूतीं । नरसिंहमूर्ति झालासी यति ।
श्रीनरसिंह-सरस्वती । समस्त यति एक रुप ॥ १९ ॥

कवणातें नमूं आपण । कवणापुढें दावूं करुणा ।
त्रयमूर्ति तूंचि ओळखें खूण । निजरुपें व्हावें स्वामिया ॥ २० ॥

तप केले बहुत दिवसीं । पूजा केली तुज मानसीं ।
आजि आली गा फळासी । मूर्ति साक्षात भेटलासीं ॥ २१ ॥

तूं तारक विश्र्वासी । म्हणोनि भूमी अवतरलासी ।
उद्धरावया आम्हांसी । दावी विश्र्वरुप चिन्मय ॥ २२ ॥

ऐसेपरी श्रीगुरुसी । स्तुति करी तो तापसी ।
श्रीगुरुमूर्ति संतोषी । जाहले निजमूर्ति एक ॥ २३ ॥

व्यक्त पाहे तये वेळी । दिसों लागलें सैन्य सकळी ।
तयामध्ये चंद्रमौळी । दिसे श्रीगुरु भक्तवरद ॥ २४ ॥

श्रीगुरु म्हणती यतीसी । नित्य आम्हां निंदा करिसी ।
‘ दंभ-दंभ ‘ नाम ऐसी । म्हणसी तूं मंदमतीने ॥ २५ ॥

याकारणें तुजपाशीं । आलों तुझ्या भक्तीसी ।
पूजा करिसी तूं मानसीं । श्रीनृसिंहमूर्तीची ॥ २६ ॥

दंभ म्हणजे कवणेपरी । सांग आतां सविस्तारीं ।
तुझे मनी वसे हरि । तोचि तुज निरोपील ॥ २७ ॥

ऐकोनि श्रीगुरुचें वचन । यतीश्र्वर करी नमन ।
क्षमा करी सद्गुरु-राणा । अविद्यास्वरुप आपण एक ॥ २८ ॥

तूं तारक विश्र्वासी । त्रयमूर्ति-अवतार तूंचि होसी ।
मज वेष्टूनि अज्ञानेसी । मायारुपें वर्तविसी ॥ २९ ॥

मायामोह-अंधकारीं । बुडालो अविद्यासागरीं ।
नोळखें परमात्मा निर्धारी । दिवांध झालों स्वामिया ॥ ३० ॥

ज्योतिःस्वरुप तूं प्रकाशी । स्वामी मातें भेटलासी ।
क्षमा करणें सेवकासी । उद्धारावे दातारा ॥ ३१ ॥

अविद्यामाया-समुद्रांत । होतो स्वामी आपण पोहत ।
न दिसे पैलपार अंत । बुडतसे स्वामिया ॥ ३२ ॥

ज्ञानतारवी बैसवोनि । करुणावायु प्रेरुनि ।
पैलथडीं निजस्थानीं । पाववी स्वामी कृपासिंधु ॥ ३३ ॥

तुझी कृपा होय ज्यासी । त्यासी कैचें दुःख दोषी ।
तोचि जिंकी कळिकाळासी । परमार्थी ऐक्य होय ॥ ३४ ॥

पूर्वी कथा ऐको श्रवणीं । महाभारती विस्तारोनि ।
दाविलें रुप अर्जुना नयनीं । प्रसन्न होऊनि तयासी ॥ ३५ ॥

तैसे तुम्हीं आजि मज । दाविलें स्वरुप निज ।
अनंत महिमा जाहलें चोज । भक्तवत्सला गुरुनाथा ॥ ३६ ॥

जय जया जगदगुरु । तूं तारक भवसागरु ।
त्रयमूर्तीचा अवतारु । नरसिंहसरस्वती ॥ ३७ ॥

कृतार्थ झालों आजि आपण । दर्शन जाहले तुझे चरण ।
न करितां सायास प्रयत्न । भेटला रत्नचिंतामणि ॥ ३८ ॥

जैसी गंगा सगरांवरी । कडे करी भवसागरी ।
जैसा विष्णु विदुराघरीं । आला आपण कृपावंत ॥ ३९ ॥

भक्तवत्सल तुझी कीर्ति । आम्हां दाविली प्रचीति ।
वर्णावया नाहीं मति । अनंतमहिमा जगदगुरु ॥ ४० ॥

येणेंपरी श्रीगुरुसी । करी स्तोत्र बहुवसी ।
श्रीगुरुमूर्ति संतोषीं । दिधला वर तये वेळीं ॥ ४१ ॥

वर देती त्रिविक्रमासी । ‘” तुष्टलों तुझ्या भक्तीसी ।
तुज सद्गति होईल भरंवसीं । पुनरावृत्ति नाहीं तुज ॥ ४२ ॥

तुज लाधेल परमार्थ । होईल ईश्र्वरीं ऐक्यता ” ।
ऐसें म्हणोनि श्रीगुरुनाथ । निघाले आपुले निजस्थाना ॥ ४३ ॥

वर देवोनि भारतीसी । राहविलें तेथे कुमसीसी ।
क्षण न लागतां परियेसीं । आले मागुती गाणगापुरा ॥ ४४ ॥

सिद्ध म्हणे नामधारका । श्रीगुरुमहिमा ऐसी ऐका ।
त्रयमूर्ति तोचि देखा । नररुपें वर्ततसे ॥ ४५ ॥

ऐसा परमपुरुष गहन गुरु । त्यातें जे का म्हणती नरु ।
तेचि पावती यमपुरु । सप्तजन्मवरी देखा ॥ ४६ ॥

गुरुब्रह्मा गुरु-विष्णु । गुरुचि होय गिरिजारमणु ।
वेदशास्त्रे पुराणें । बोलताति प्रसिद्ध ॥ ४७ ॥

याकारणे श्रीगुरुसी । निश्र्चयावें त्रिमूर्ति ऐसी ।
विश्र्वास माझिया बोलासी । लीन व्हावें गुरुचरणीं ॥ ४८ ॥

अमृताची आरवटी । घातली असे गोमटी ।
ज्ञानी जन भरती घोटी । गुरुचरित्रकामधेनु ॥ ४९ ॥

गंगाधराचा नंदन । सांगे गुरुचरित्र विस्तारुन ।
भक्तिपूर्वक ऐकती जन । लाधे पुरुषार्थ चतुर्विध ॥ ५० ॥

॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे
त्रिविक्रमभारतीविश्र्वरुपदर्शनं नाम चतुर्विंशोऽध्यायः
॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

Leave a Reply