You are currently viewing Shri Guru Charitra Adhyay 22 – श्री गुरुचरित्र अध्याय बाईस

Shri Guru Charitra Adhyay 22 – श्री गुरुचरित्र अध्याय बाईस

श्री गुरु चरित्र परयाण का यह बाईसवां अध्याय है श्री गुरु चरित्र में कुल 53 अध्याय हैं आप इन्हें एक एक कर पाठ करे सभी आधाय का लिंक नीचे दिया गया है.


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
नामधारक शिष्यराणा । लागे सिद्धाचिया चरणा ।
करसंपुट जोडून । विनवीतसे परियेसा ॥ १ ॥

जय जया सिद्ध योगेश्र्वरा । शिष्यजनमनोहरा ।
तूंचि तारक भवसागरा । अज्ञानतिमिरा ज्योति तूं ॥ २ ॥

तुझे चरणसंपर्क होतां । ज्ञान झालें मज आतां ।
परमार्थी मन ऐक्यता । जाहलें तुझे प्रसादे ॥ ३ ॥

दाविली तुम्ही गुरुची सोय । तेणें सकळ ज्ञानमय ।
तूंचि तारक योगी होय । परमपुरुषा सिद्धराया ॥ ४ ॥

श्रीगुरुचरित्रकामधेनु । सांगितलें मज विस्तारुन ।
अद्यापि न धाय माझें मन । आणिक आवडी होतसे ॥ ५ ॥

मागें कथन निरोपिलें । श्रीगुरु गाणगापुरा आले ।
पुढें केवीं वर्तले । ते विस्तारावे दातारा ॥ ६ ॥

ऐकोनि शिष्याचें वचन । सांगे सिद्ध संतोषोन ।
म्हणे शिष्या तूंचि सगुण । गुरुकृपेच्या बाळका ॥ ७ ॥

धन्य धन्य तुझें मन । धन्य धन्य तुझें जीवन ।
होसी तूंचि पूज्यमान । या समस्त लोकांत ॥ ८ ॥

तुवां केल्या प्रश्र्नासी । संतोष माझे मानसीं ।
उल्हास होतो सांगावयासी । गुरुचरित्रकामधेनु ॥ ९ ॥

पुढें जाहली अनंत महिमा । सांगतां असे अनुपम्या ।
श्रीगुरु आले गाणगाग्रामा । राहिले संगमी गुप्तरुपें ॥ १० ॥

भीमा उत्तरवाहिनीसी । अमरजासंगम विशेषीं ।
अश्र्वत्थवृक्ष परियेसीं । महास्थान वरद भूमि ॥ ११ ॥

अमरजानदी तीर्थ थोर । संगम जाहला भीमातीर ।
प्रयागासमान असे क्षेत्र । अष्टतीर्थे असती तेथें ॥ १२ ॥

तया तीर्थांचे महिमान । अपार असे आख्यान ।
पुढें तूंतें विस्तारुन । सांगेन ऐक शिष्योत्तमा ॥ १३ ॥

तया स्थानीं श्रीगुरुमूर्ती । होते गौप्यरुपें आर्ती ।
तीर्थमहिमा करणें ख्याति । भक्तजनतारणार्थ ॥ १४ ॥

समस्त तीर्थे श्रीगुरुचरणी । ऐसे बोलती वेदवाणी ।
त्यासी काय असे तीर्थ गहनी । प्रकाश करी क्षेत्रांसी ॥ १५ ॥

भक्तजनतारणार्थ । तीर्थे हिंडे श्रीगुरुनाथ ।
गौप्य होती कलियुगांत । प्रगट केलीं श्रीगुरुनाथें ॥ १६ ॥

तेथील महिमा अनुक्रमेसी । सांगेन पुढें विस्तारेसी ।
प्रकट जाहले श्रीगुरु कैसी । सांगेन ऐक एकचित्ते ॥ १७ ॥

ऐसा संगम मनोहरु । तेथें वसती श्रीगुरु ।
त्रिमूर्तीचा अवतारु । गौप्य होय कवणेपरी ॥ १८ ॥

सहस्र किरणें सूर्यासी । केवीं राहे गौप्येसीं ।
आपोआप प्रकाशी । होय सहज गुण तयाचा ॥ १९ ॥

वसती अरण्यीं संगमासी । जाती नित्य भिक्षेसी ।
तया गाणगापुरासी । मध्यान्हकाळीं अवधारा ॥ २० ॥

तया ग्रामी द्विजवर । असती एकशत घर ।
होते पूर्वी अग्रहार । वेदपाठक ब्राह्मणांसी ॥ २१ ॥

तयांमध्ये विप्र एक । दरिद्री असे सुक्षीणक ।
त्याची भार्या पतिसेवक । ‘ पतिव्रता ‘ तिये नाम ॥ २२ ॥

वर्तत असे दरिद्रेसीं । असे एक वांझ महिषी ।
वेसण घातली असे नाकाशी । दंतहीन अतिवृद्ध ॥ २३ ॥

नदीतीरी मळेयासी । क्षारमृत्तिका घालावयासी ।
नित्य दाम देती त्यासी । मृत्तिका क्षार वहावया ॥ २४ ॥

तेणें द्रव्यें वरो घेती । येणें रीतीं काळ क्रमिती ।
श्रीगुरुनाथ अति प्रीतीं । जाती भिक्षेसी त्याचे घरीं ॥ २५ ॥

विप्र समस्त निंदा करिती । कैचा यति आला म्हणती ।
आम्ही ब्राह्मण असो श्रौती । न ये भिक्षेसी आमुचे घरीं ॥ २६ ॥

नित्य आमुच्या घरीं देखा । विशेषान्न अनेक शाका ।
असें त्यजूनि ऐका । जातो दरिद्रियाचे घरी ॥ २७ ॥

भक्तवत्सल श्रीगुरुनाथ । प्रपंचरहित परमार्थ ।
सेवक जनां कृतार्थ । करणें असे आपुले मनीं ॥ २८ ॥

पाहें पां विदुराचिया घरा । प्रीति कैसी शार्ङ्गधरा ।
दुर्योधनराजद्वारा । धींक न वचे परियेसा ॥ २९ ॥

सात्विकबुद्धी जे वर्तती । त्यांवरी श्रीगुरुची अतिप्रीति ।
इह सौख्य अपरीं गति । देतो आपले भक्तांसी ॥ ३० ॥

ऐसा कृपाळू परमपुरुष । भक्तांवरी प्रेम हर्ष ।
त्यासी दुर्बळ काय दोष । रंकासी राज्य देऊं शके ॥ ३१ ॥

जरी कोपे एखाद्यासी । भस्म करील परियेसीं ।
वर देतां दरिद्रियासी । राज्य देईल क्षितीचें ॥ ३२ ॥

ब्रह्मदेवें आपुल्या करें । लिहिलीं असती दुष्टाक्षरें ।
श्रीगुरुचरणसंपर्कशिरे । दुष्टाक्षरें ती शुभ होतीं ॥ ३३ ॥

ऐसें ब्रीद श्रीगुरुचें । वर्णू न शके आमुचे वाचे ।
थोर पुण्य त्या ब्राह्मणाचें । श्रीगुरुमूर्ति जाती घरा ॥ ३४ ॥

वर्ततां ऐसें एके दिवशीं । न मिळे वरो त्या ब्राह्मणासी ।
घरीं असे वांझ महिषी । नेली नाही मृत्तिकेला ॥ ३५ ॥

तया विप्रमंदिरासी । श्रीगुरु आले भिक्षेसी ।
महा उष्ण वैशाखमासीं । माध्यान्हकाळीं परियेसा ॥ ३६ ॥

ऐसा श्रीगुरुकृपामूर्ति । गेला द्विजगृहाप्रती ।
विप्र गेला याचकवृत्तीं । वनिता त्याची घरी असे ॥ ३७ ॥

भिक्षा म्हणतां श्रीगुरुनाथ । आली पतिव्रता धावत ।
साष्टांगेसीं दंडवत । करिती झाली तये वेळी ॥ ३८ ॥

नमन करुनि श्रीगुरुसी । विनवीतसे करुण-वचनेंसी ।
आपला पति याचकतेसी । गेला असे अवधारा ॥ ३९ ॥

उत्कृष्ट धान्य घरीं बहुत । घेवोनि येईल पति त्वरित ।
तंववरी स्वामी बैसा म्हणत । पाट घातला बैसावया ॥ ४० ॥

श्रीगुरुमूर्ति हास्यवदन । बैसते झाले शुभासनें ।
तया विप्रस्रीसी म्हणे । क्षीर कां वो न घालिसी ॥ ४१ ॥

तुझ्या द्वारीं असतां म्हैषी । क्षीर कां वो न घालिसी भिक्षेसी ।
आमुतें तुवां चाळविसी । नाहीं वरो म्हणोनियां ॥ ४२ ॥

श्रीगुरुवचन ऐकोन । विप्रवनिता करी नमन ।
वांझ महिषी दंतहीन । वृद्धाप्य झालें तियेसी ॥ ४३ ॥

उपजली आमुचे घरी । वांझ जाहली दगडापरी ।
गाभा नवचे कवणेपरी । रेडा म्हणोनि पोसितों ॥ ४४ ॥

याचिकारणें तियेसी । वेसण घातली परियेसी ।
वहावया मृत्तिकेसी । तेणें आमुचा योगक्षेम ॥ ४५ ॥

श्रीगुरु म्हणती तियेसी । मिथ्या कां वो बोलसी ।
त्वरित जावोनियां म्हैषीसी । दोहोनि आणी क्षीर आम्हां ॥ ४६ ॥
ऐसें वचन ऐकोनि । विश्र्वास झाला तिचे मनीं ।
काष्टपात्र घेऊनि । गेली ऐका दोहावया ॥ ४७ ॥

श्रीगुरुवचन कामधेनु । विप्रवनिता जातां क्षण ।
दुहिली क्षीर संतोषोन । भरलीं पात्रे दोन तया वेळी ॥ ४८ ॥

विस्मय करी विप्रवनिता । म्हणे ईश्र्वर हा निश्र्चिता ।
याचे वाक्य परीस सत्या । काय नवल म्हणतसे ॥ ४९ ॥

क्षीर घेवोनि घरांत । आली पतिव्रता धांवत त्वरित ।
तापविती जाहली अग्नींत । सवेंचि निववी परियेसा ॥ ५० ॥

श्रीगुरु म्हणती तियेसी । घाली वो क्षीर भिक्षेसी ।
जाणें असे स्थानासी । म्हणोनि निरोपिती तये वेळी ॥ ५१ ॥

परिसोनि स्वामींचे वचन । घेवोनि आली क्षीरभरण ।
प्राशन करी श्रीगुरुराणा । अतिसंतोषेकरोनियां ॥ ५२ ॥

संतोषोनि श्रीगुरुमूर्ति । वर देती अतिप्रीतीं ।
तुझे घरी अखंडिती । लक्ष्मी राहो निरंतर ॥ ५३ ॥

पुत्रपौत्री श्रियायुक्त । तुम्हां होईल निश्र्चित ।
म्हणोनि निघाले त्वरित । संगमी आपुले स्थानासी ॥ ५४ ॥

श्रीगुरु गेले संगमासी । आला विप्र घरासी ।
ऐकता झाला विस्तारेसी । महिमा श्रीगुरु-नरसिंहाची ॥ ५५ ॥

म्हणे अभिनव झालें थोर । होईल ईक्ष्वर-अवतार ।
आमुचे दृष्टीं दिसे नर । परमपुरुष तोचि सत्य ॥ ५६ ॥

विप्र म्हणे स्रियेसी । गेले आमुचे दरिद्रदोषी ।
भेटी जाहली श्रीगुरुसी । सकळाभीष्टें साधली ॥ ५७ ॥

म्हणोनि मनी निर्धार करिती । भेटी जाऊं कैसा यति ।
हाती घेऊनि आरति । गेले दंपती संगमासी ॥ ५८ ॥

भक्तिपूर्वक श्रीगुरुसी । पूजा करिती विधीसीं ।
संतोषोनि श्रीगुरु तयासी । पुनरपि वर देते झाले ॥ ५९ ॥

येणेंपरी द्विजवर । लाधला जैसा जाहला वर ।
कन्या-पुत्र लक्ष्मी स्थिर । पूर्णायुषी जाहले जाण ॥ ६० ॥

सिद्ध म्हणे शिष्यासी । श्रीगुरुकृपा होय ज्यासी ।
दैन्य कैचे त्या नरासी । अष्टैश्र्वर्य भोगीतसे ॥ ६१ ॥

म्हणोनि सरस्वती-गंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार ।
ऐकतां होय मनोहर । दैन्यावेगळा होय त्वरित ॥ ६२ ॥

॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने
सिद्ध-नामधारकसंवादे वंध्यामहिषीदोहनं नाम द्वाविंशोऽध्यायः

॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

Leave a Reply