You are currently viewing Shri Guru Charitra Adhyay 42 – श्री गुरुचरित्र अध्याय बयालीस

Shri Guru Charitra Adhyay 42 – श्री गुरुचरित्र अध्याय बयालीस

श्री गुरु चरित्र परयाण का यह बयालीसवाँ अध्याय है श्री गुरु चरित्र में कुल 53 अध्याय हैं आप इन्हें एक एक कर पाठ करे सभी आधाय का लिंक नीचे दिया गया है .

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

श्रीगुरु म्हणती द्विजासी । या अनंतव्रत माहा्त्म्यासी ।
तुवां पुसिलें आम्हांसी । पूर्वी बहुतीं आराधिलें ॥ १ ॥

युधिष्ठिर पंडुसुत । त्याणें केलें हेंचि व्रत ।
राज्य लाधला त्वरित । ऐसें व्रत हें उत्तम ॥ २ ॥

ऐसें म्हणतां द्विजवरु । करिता झाला नमस्कारु ।
पूर्वी राजा पंडुकुमरु । आणिक राज्य केवीं जाहलें ॥ ३ ॥

श्रीगुरु म्हणती द्विजासी । होतें राज्य पांडवांसी ।
द्यूतकर्म कौरवांसी । करुनि राज्य हारविलें ॥ ४ ॥

मग निघाले वनांतरा । कष्टत होते वर्षें बारा ।
ऐसें तया युधिष्ठिरा । राज्य गेलें परियेसा ॥ ५ ॥

तया घोर अरण्यांत । युधिष्ठिर देखा बंधूंसहित ।
असे चिंताव्याकुळित । सदा ध्याय श्रीहरीसी ॥ ६ ॥

समस्त राज्य सांडूनि । वास केला तींही वनीं ।
कौरवीं कपट करोनि । नानापरी विघ्नें केलीं ॥ ७ ॥

सत्त्व टाळावयासी । पाठविलें त्या दुर्वासासी ।
त्यांसी येऊनि हृषीकेशी । रक्षीतसे परियेसा ॥ ८ ॥

नाना तीर्थें नाना व्रतें । आचरिलें तेथें बहुतें ।
कष्टताति अति उन्नत । निर्वाणरुप होऊनियां ॥ ९ ॥

भक्तवत्सल नारायण । त्यांचे कष्ट वळखून ।
आला तेथें ठाकोन । जेथें होते पंडुकुमर ॥ १० ॥

कृष्ण येतां देखोनि । धर्म जाय लोटांगणीं ।
दंड प्रणाम करुनि । वंदिता झाला तये वेळीं ॥ ११ ॥

आपुले केश मोकळी । झाडीतसे कृष्णचरणधूळी ।
बैसकार करुनि तये वेळीं । वंदीतसे विनयेंसीं ॥ १२ ॥

अर्घपाद्य देवोनि । गंधाक्षता लावूनि ।
जी कां पुष्पें होती रानीं । त्याणें पूजा करीतसे ॥ १३ ॥

पूजोनियां भक्तींसीं । विनवीतसे परियेसीं ।
” जयजया जी हृषीकेशी । भक्तवत्सल कृष्णनाथा ॥ १४ ॥

जय अनंता नारायणा । भवसागरउद्धारणा ।
कृपाळूवा लक्ष्मीरमणा । क्षीराब्धिशयना वासुदेवा ॥ १५ ॥

परमात्मा परमज्योति । तूंचि करिसी उत्पत्ति स्थिति ।
लय करिसी तूंचि अंती । त्रैमूर्ति तूंचि देवा ॥ १६ ॥

तूंचि विश्र्वाचा जिव्हाळा । होऊनि रक्षिसी सकळां ।
वास तुझा सूक्ष्म स्थूळा । अणुरेणुतृणकाष्ठीं ॥ १७ ॥

नमन तुझे चरणासी । त्रिगुणात्मा हृषीकेशी ।
रजोगुणें सऋुष्टीसी । त्वांचि देवा रचियेली ॥ १८ ॥

दुष्टनिग्रह करणें । साधुजना रक्षणें ।
ऐसीं वेदपुराणें । बोलताति प्रख्यात ॥ १९ ॥

फेडावया भूमिभार । केला तुवां अवतार ।
जड जाहला युधिष्ठिर । तरी कां तुवां ठेविला ॥ २० ॥

आपुले प्राण आम्हांसी । म्हणोनि जगीं वानिसी ।
पाठवूनि अरण्यासी । कष्टविलें नानापरी ॥ २१ ॥

तुझी कृपा होय ज्यासी । कष्ट कैंचे होती त्यासी ।
उपेक्षूनि आम्हांसी । अरण्यांत ठेविले ॥ २२ ॥

तुजवांचोनि आम्हांसी । आता सांगो कवणापाशीं ।
जरी आम्हां उपेक्षिसी । काय कांक्षा जीवाची “॥ २३ ॥

इतुकियावरी भीमसेन । येऊनि धरी श्रीकृष्णचरण ।
स्वामी आम्हांसी कां शीण । कां उपेक्षा करितोसी ॥ २४ ॥

धनंजय तये वेळीं । वंदीतसे चरणकमळीं ।
विनवीतसे करुणाबहाळी । कृपाळुवा मुरारि ॥ २५ ॥

तुझ्या कृपादृष्टीसी । होतों आम्ही अरण्यवासी ।
घडले कष्ट सायासीं । उबगलों स्वामी बहुत ॥ २६ ॥

आतां आमुचे कष्टहरण । पांडवांचा तूंचि प्राण ।
ब्रीद राखें गा नारायणा । म्हणतसे तये वेळीं ॥ २७ ॥

माद्रीदेवीचे कुमर । करुनियां नमस्कार ।
द्रौपदीसहित पुरःसर । पांचही वंदिती तये वेळीं ॥ २८ ॥

” तूं आमुचा कैवारी । आम्ही असों अरण्यघोरीं ।
आमुचा बंधु राज्य करी । काय उपाय आम्हांसी ॥ २९ ॥

तुजसारिखें असतां छत्र । आम्हां कष्ट अपरमित ।
कवणें प्रकारे स्वस्थचित्त । राज्यप्राप्ति आम्हांसी ॥ ३० ॥

कैसा उपाव आम्हांसी । सांगा स्वामी हृषीकेशी ।
” ऐसें म्हणतां श्रीकृष्णासी । कृपा उपजे मनांत ॥ ३१ ॥

कृष्ण म्हणे पंडुसुतां । सांगेन तुम्हां एकव्रता ।
तात्काळ प्रसन्नता । राज्य होय तुम्हांसी ॥ ३२ ॥

व्रतांमध्यें उत्तम व्रत । अनंतनाम विख्यात ।
हें आचरावें तुम्हीं त्वरित । राज्य होईल तुम्हांसी ॥ ३३ ॥

आतां सांगेन तुम्हांसी । अनंत कवण म्हणसी ।
सर्वां ठायीं आपण वासी । ‘ अनंत ‘ नाम आम्हां असे ॥ ३४ ॥

कला काष्ठा मुहूर्त आपण । दिन रात्रि सर्व शरीर जाण ।
पक्ष मास वर्ष आपण । युग कल्प आदि करोनियां ॥ ३५ ॥

अवतरलों मी नारायण । भूभार उतरावयाकारण ।
दानव दुष्ट निवारणा । जन्म जाहला वसुदेवकुळीं ॥ ३६ ॥

अनंत मीच जाणसी । संशय न धरीं मानसीं ।
त्रैमूर्ति मीच सर्वांशी । ब्रह्मा-विष्णु-महेश्र्वर ॥ ३७ ॥

आपणचि सूर्य शशी देखा । चतुर्दश भुवनें मीचि ऐका ।
अष्टवसु आहेत जे का । द्वादशार्क आपणचि ॥ ३८ ॥

रुद्र असती एकादश । सप्तसमुद्र परियेस ।
ऋषि सप्त असती विशेष । पर्वतादि नदी आपणचि ॥ ३९ ॥

जितुके वृक्ष आहेति क्षिती । आकाशीं नक्षत्रें दिसतीं ।
दाही दिशा आहेति ख्याति । भूमि आपण म्हणे कृष्ण ॥ ४० ॥

असती सप्त पाताळ । भूर्भुवादि लोक सकळ ।
अणुरेणु तृण काष्ठ सकळ । विश्र्वात्मा आपणचि ॥ ४१ ॥

न करीं संशय युधिष्ठिरा । अनंत म्हणजे मीचि निर्धारा ।
विधिपूर्वक पूजा करा । व्रत तुम्हांसी बरवें असे ॥ ४२ ॥

विनवी युधिष्ठिर कर जोडोनि । सांगा स्वामी विस्तारोनि ।
व्रत असे कवण विधानीं । कवण दान कोणेपरी ॥ ४३ ॥

करावें व्रत कवणें दिवशीं । विस्तारोनि सांगा आम्हांसी ।
पूर्वी कवणें आचरिलें ऐसी । निरोपावें दातारा ॥ ४४ ॥

कृष्ण म्हणे युधिष्ठिरासी । तुवां पुसिलें आम्हांसी ।
शुक्लपक्ष भाद्रपदमासीं । चतुर्दशी परियेसा ॥ ४५ ॥

आराधावें अनंतासी । त्वरित राज्य तूं पावसी ।
पूर्वीं कवणें केले म्हणसी । सांगेन ऐका तत्पर ॥ ४६ ॥

‘ आसीत्पुरा ‘ कृतयुगेसी । ‘ सुमंतु ‘ नाम द्विज परियेसी ।
उत्पन्न झाला वसिष्ठ गोत्रासी । भृगुकन्या ‘ दीक्षा ‘ नामें ॥ ४७ ॥

तेचि झाली सुमंताची भार्या । पतिव्रता औदार्या ।
कन्या झाली तिसी सुतनया । नाम तियेचे ‘ सुशिला ‘ ॥ ४८ ॥

वर्तता ऐसे एके दिवसीं । जाहले प्राप्त दैववशीं ।
सुमंतुपत्नी पंचत्वासी । पावली कलेवर सोडोनि ॥ ४९ ॥

सुशीला कन्या सुमंताघरी । नित्य भक्ति सदाचारी ।
करीतसे विचित्री । सर्वमंगळ स्वरुप ॥ ५० ॥

गृहशोभा करी बहुत । नानापत्रें तोरणें करीत ।
पंचवर्ण चूर्ण मिश्रित । रंगमाळा सहित देखा ॥ ५१ ॥

स्वस्तिकादि शंख पद्मेसीं । नित्य लिही मनोवाक्वायकर]मेसी ।
नमस्कारी मनोधर्मेसीं । देवतार्चन-सोपस्कार करी ॥ ५२ ॥

सुमंतूसी भार्याहीनत्व झालें । समस्त कर्म राहिले ।
पुनःसंधान पाहिजे केले । म्हणोनि नारी आणिक केली ॥ ५३ ॥

तिचें नाम असे कर्कशा । दुःशीला आचरणीं परियेसा ।
नित्य कलह करी बहुवसा । कन्यापतीसवें देखा ॥ ५४ ॥

सुशीलाकन्या उपवर झाली । सुमंतु चिंती वेळोवेळीं ।
इसी एखादा वर मिळेल जवळी । कन्यादान करीन म्हणे ॥ ५५ ॥

ऐसें चिंततां एके दिवसीं । तेथें आला कौडिण्य ऋषि ।
विचारिता कन्येसी । सुमंते अंगीकार केला ॥ ५६ ॥

कन्यादान गृह्योक्तेसी । देता जाहला कौंडिण्यासी ।
मिळोनी होते दोन मासीं । आषाढ आणि श्रावण ॥ ५७ ॥

कन्यामातेतें जाहले वैर । सापत्निकाचा हाचि विचार ।
कौंडिण्य पुसे सुमंता सत्वर । जाऊं आश्रमा आणिका ठायां ॥ ५८ ॥

सुमंतु बहु दुःख करी । म्हणे स्त्री नव्हे माझी वैरी ।
कन्या जाईल आतां दूरी । कैंची पापिणी वरिली म्यां ॥ ५९ ॥

शांत पत्नी नाहीं ज्याचे घरीं । त्यासी अरण्य नाहीं दूरी ।
ऐक स्वामी त्रिपुरारि । संसारसागरीं बुडालों ॥ ६० ॥

नवचे माझें कर्म तापसा । न ऐके बोल हे कर्कशा ।
कन्या असतां घरीं संतोषा । नित्य दर्शन जामाता ॥ ६१ ॥

ऐसी सुमंतु चिंता करी । कौडिण्य ऋषि त्यासी वारी ।
दोघे तापसी एका घरीं । असों नये धर्महानि ॥ ६२ ॥

जाऊं आम्ही आणिक स्थाना । तप करुं अनुष्ठाना ।
भेटी होईल पुनः पुनः । जवळीच करुं आश्रम ॥ ६३ ॥

सुमंतु म्हणे कौंडिण्यासी । आणिक रहावें बारा दिवसीं ।
‘ सर्वसिद्धा ‘त्रयोदशीसी । प्रस्थान तुम्हीं करावें ॥ ६४ ॥

सुमंतूची विनंति ऐकोन । आणिक राहिले तेरा दिन ।
मुहूर्तप्रस्थान करुन । येरे दिवसीं निघाले ॥ ६५ ॥

सुमंतु म्हणे कर्कशेसी । कन्या जाय पतीसरसीं ।
भोजन द्यावें जामातासी । व्रीहि-गोधूमान्न दे म्हणे ॥ ६६ ॥

पति सांगता काय केलें । धांवत आपण घरांत गेली ।
कवाडा घालूनि दृढ खिळी । पाषाण रचिले द्वारघटा ॥ ६७ ॥

कांहीं केलिया नुघडी द्वार । सुमंतु विनवी आफळी शीर ।
सुशीला कन्या धरी कर । म्हणे जाऊं तैसेचि ॥ ६८ ॥

पाहूं गेला स्वयंपाकघरा । होता गोधूम-करा ।
देता झाला कन्यावरा । निरोप दिल्हा दोघांसी ॥ ६९ ॥

दोघें बैसोनि रथावरी । निघाला कौंडिण्य संतोषकरीं ।
माध्याह्नकाळीं नदीतीरीं । अनुष्ठाना उतरला ॥ ७० ॥

ऋषि बैसला अनुष्ठानीं । सुशीला होती रथस्थानीं ।
तीरीं पाहतसें गहनीं । स्त्रियासमुदाय बहु असे ॥ ७१ ॥

रक्तांबर-वस्त्रेसीं । परिधान केलें बहुवसीं ।
व्रत म्हणती चतुर्दशी । कलश पूजिती पृथक् पृथक् ॥ ७२ ॥

पाहूनि हळूहळू सुशीला । गेली तया सुवासिनींजवळा ।
पुसती झाली वेल्हाळा । काय व्रत करितां तुम्ही ॥ ७३ ॥

स्त्रिया म्हणती सुशीलेसी । अनंतव्रत असे परियेसीं ।
पूजितां होय तात्काळेसी । सकळाभीष्ट पावती ॥ ७४ ॥

सुशीला म्हणे नारींसी । कवण विधान सांगा आम्हांसी ।
कृपा करोनि विस्तारेंसी । निरोपावें अहो मातें ॥ ७५ ॥

समस्त नारी मिळोनि । सांगताति विस्तारोनि ।
ऐक सुशीले बैस म्हणोनि । आद्यंतेसीं निरोपिती ॥ ७६ ॥

भाद्रपद शुक्ल चतुर्दशीं । व्रत करावें परियेसीं ।
अनंत नाम ख्यातीसी । सांगेन तुज ऐक पां ॥ ७७ ॥

रक्तपट्टसूत्रेसीं । अनंत करावा चतुर्दश-ग्रंथींसीं ।
घेवोनि यावें नदीसीं । स्नान करावें शुचीनें ॥ ७८ ॥

दिव्यांबर परिधानूनि । हळदीकुंकुम लावोनि ।
आणावे कलश नूतन दोनी । गंगा यमुना म्हणोनियां ॥ ७९ ॥

उदक भरोनि तयांत । पंचपल्लव-रत्नसहित ।
घालूनि पूजावें त्वरित । षोडशोपचारेंकरुनि ॥ ८० ॥

नाना प्रकारें आरती । करावी गंगायमुनेप्रती ।
मग पूजावे दर्भग्रंथी । शेषरुपें करोनियां ॥ ८१ ॥

दोनी कलशांवरी देखा । नूतन वस्त्र ठेवावें निका ।
पद्म लिहावें अष्टदलिका । कलशांवरी ठेवावें ॥ ८२ ॥

तया कलशांपुढे देखा । शंखपद्म घालावें अनेका ।
पंचवर्ण चूर्ण देखा । रंगमाळिका घालाव्या ॥ ८३ ॥

शेष पूजावें दर्भाचे । षोडशोपचारीं वाचें ।
ध्यान करावें विष्णूचें । ‘ शेषशाई ‘ म्हणोनियां ॥ ८४ ॥

सप्तफणीचे शेषासी । सदा विष्णु तयापाशीं ।
याचिकारणें नाम तयासी । ‘ अनंत ‘ ऐसें करावें ध्यान ॥ ८५ ॥

पिंगलाक्ष चतुर्भुजेंसी । शंख पद्म सव्य करेंसीं ।
चक्र गदा वाम हस्तेंसीं । ऐशा मूर्तीचें ध्यान करावें ॥ ८६ ॥

‘ ॐ नमो भगवते ‘–मंत्रेसीं । षोडशोपचारें दर्भग्रंथीसी ॥
आणोनि नवे दोरेसी । ध्यान करावें मग तेथें ॥ ८७ ॥

‘ अनंतगुणरत्नाय ‘ मंत्रेंसीं । नवे दोरे ठेवावे कलशेंसी ।
पूजा करावी पुरुषसूक्तेंसी । ‘ अतोदेवा ‘ मंत्रेसहित ॥ ८८ ॥

षोडशोपचारें पूजोनि । ‘ संसारगव्हरेति ‘ मंत्रे बांधा करदक्षिणीं ।
‘ नमस्ते वासुदेव ‘ मंत्रेनि । जीर्ण दोर विसर्जावा ॥ ८९ ॥

‘ दाता च विष्णुर्भगवान् ‘ म्हणत । वाण द्यावें गोधूम घृत ।
प्रस्त असावें परिमित । स-गुड स-फल द्यावें वाण ॥ ९० ॥

अपूपादि पायसान्नेंसीं । सदक्षिणा तांबूलेंसी ।
अर्धें द्यावें ब्राह्मणासी । अर्धे आपण भोजन करावें ॥ ९१ ॥

ऐसें चवदा वर्षें देखा । व्रत आचरावें विशेषा ।
उद्यापन करावें निका । चतुर्दश कलश द्यावे ॥ ९२ ॥

ब्राह्मणभोजन करुन । भक्तीनें करावें उद्यापन ।
कामना होईल संपूर्ण चतुर्विध पुरुषार्थ ॥ ९३ ॥

ऐसी सांगती सुशीलेसी । व्रत आचरीं वो त्वरितेसीं ।
आजि असे चतुर्दशी । व्रत करीं आम्हांसवें ॥ ९४ ॥

समस्त मिळोनि तिसी । तंतु देती अनंतासी ।
गांठी बांधिती चतुर्दशी । व्रत करीं आम्हामसवें ॥ ९५ ॥

कोंडा होता गोधूमाचा । आणोनि दे ती अर्ध वाचा ।
वाण देऊनि सुवाचा । निरोप घेतला स्त्रियांचा ॥ ९६ ॥

समस्त स्त्रियांसी वंदिली । आली आपुले रथाजवळी ।
अनुष्ठान होतां ऋषि तये वेळीं । आला आपुले स्त्रियेपाशीं ॥ ९७ ॥

चला म्हणोनि पुढें निघती । दोघें बैसोनियां रथी ।
जातां पुढें नगर देखती । अमरावती ऐसें देखा ॥ ९८ ॥

नगरलोक सामोरे येती । चला स्वामी ऐसें म्हणती ।
‘ तुम्ही या नगरा अधिपती । तपोनिधि ‘ म्हणती लोक ॥ ९९ ॥

नाना समारंभे देखा । नगरीं प्रवेशले दंपती ऐका ।
ऐश्र्वर्य भोगिलें बहुसुखा । श्रीमदनंतप्रसादें ॥ १०० ॥

ऐसें किती दिवसवरी । होता कौंडिण्य सहनारी ।
बैसला असतां संतोषकरी । देखता जाहला अनंतासी ॥ १०१ ॥

ऋषि पुसे स्त्रियेसी । काय बांधिलें हस्तमूळेंसी ।
वश्यकरणें आम्हांसी । रक्तदोरा बांधिला ॥ १०२ ॥

सुशीला म्हणे भ्रतारासी । अनंत दोरा परियेसीं ।
याचिया प्रसादें आम्हांसीं । अष्टैश्र्वर्य प्राप्त जाहलें ॥ १०३ ॥

म्यां जे दिवशीं व्रत केलें । तेणें तुम्हां दैव आलें ।
आम्हां अनंत प्रसन्न जाहले । म्हणोनि बोले सुशीला ॥ १०४ ॥

ऐसें वचन ऐकोनि । कौंडिण्य कोपें प्रज्वाळला मनीं ।
दोरा हिरोनि घेऊनि । अग्निकुंडीं सांडिला ॥ १०५ ॥

मग म्हणे कैंचा श्रीमदनंत । म्यां तप केलेंसे बहुत ।
तेणें ऐश्र्वर्य सुकृतार्थ । प्राप्त झालें आम्हांसी ॥ १०६ ॥

वशीकरण केलें आम्हांसी । दोरा बांधिला अनंत म्हणसी ।
रागेंकरोनि कौंडिण्यऋषीं । अग्नीमधें घातला दोरा ॥ १०७ ॥

हा हा म्हणोनि सुशिला मनीं । धांवत गेली अग्निस्थानीं ।
काढोनियां क्षीरस्नपनी । केले देखा दोरकासी ॥ १०८ ॥

अनंतक्षोभ-दोषेंसी । अष्टैश्र्वर्य गेलें तत्क्षणेंसी ।
दरिद्री झाला परियेसीं । द्विजवर कौंडिण्य देखा ॥ १०९ ॥

नगरीं झाले सर्व शत्रु । गोधनादि आभरण वस्तु ।
समस्त नेलें तस्करें । दरिद्र आलें तात्काळीं ॥ ११० ॥

गृह दग्ध झालें देखा । उरलें नाही वस्त्र एका ।
अवकृपा होतां श्रीमदनंतका । सर्व गेलें त्तक्षणीं ॥ १११ ॥

मग विचारी मानसी । म्हणे अनंत रुसला आम्हांसी ।
वायां घातले अग्नीसी । मदांधें मज वेष्टिलें ॥ ११२ ॥

करीन आतां नेम एक । जेव्हां भेटेल लक्ष्मीनायक ।
श्रीमदनंतदर्शनें सुख । अन्नोदक घेईन मी ॥ ११३ ॥

म्हणोनि निर्वाण करोनि । निघे तो अरण्यभुवनीं ।
भार्येसहित कौंडिण्य मुनी । निघता झाला परियेसा ॥ ११४ ॥

हा अनंता हा अनंता म्हणत । जात असे अरण्यांत ।
तंव देखिला वृक्ष-चूत । पुष्प-फळें भरला असे ॥ ११५ ॥

कीटकादि पक्षिजाति । कोणी त्यासी नातळती ।
कौंडिण्य पुसे तयाप्रती । तुवां अनंतासी देखिलें कीं ॥ ११६ ॥

वृक्ष म्हणे ब्राह्मणासी । दृष्टिं न पडेचि आम्हांसी ।
तुवां जरी देखिलें त्यासी । तरी आम्हांनिमित्य सांगावें ॥ ११७ ॥

ऐसे ऐकोनि पुढें जातां । धेनु देखिली वत्ससहिता ।
हिंडतसे तृणांत । तोंडीं न ये भक्षावया ॥ ११८ ॥

द्विज म्हणे धेनूसी । जरी तुवा अनंत देखिलासी ।
कृपा करोनि सांग आम्हांसी । धेनु म्हणे तयांतें ॥ ११९ ॥

मीं नाही देखिलें अनंतासी । तुम्हां भेटी होईल जरी त्यासी ।
मजविषयीं सांगा, ऐसी । अवस्था आम्हां घडली असे ॥ १२० ॥

ऐसें ऐकोनि द्विजवर । पुधें जातां देखिला वृषभ थोर ।
त्यांतें पुसे मुनिवर । तुवां अनंतातें देखिलें कीं ॥ १२१ ॥

गोस्वामी म्हणे तयासी । नेणों आम्ही अनंतासी ।
जरी तुवां देखिलासी । आम्हांविषयीं विनवावें ॥ १२२ ॥

पुढें जातां कौंडिण्य मुनि । सरोवरें देखिलीं दोनी ।
उदक मिळालें अन्योन्यीं । हंसादि पक्षी न सेविती ॥ १२३ ॥

कमळ-कुमुदादि पुष्पेंसी । मिरवितीं सरोवरे ऐसीं ।
द्विज पुसे तयांसी । अनंतासी देखिले म्हणोनि ॥ १२४ ॥

सरोवरें म्हणतीं तयासी । नेणों कैंचा अनंत पुससीं ।
भेटी होईल जरी तुम्हांसी । आम्हांनिमित्य सांगावें ॥ १२५ ॥

पुढें जातां द्विजवर । देखिले गर्दभ कुंजर ।
पुसतसे तयां विचार । न बोलती त्या द्विजासी ॥ १२६ ॥

निर्वाण झाला तो ब्राह्मण । त्यजूं पाहे आपुला प्राण ।
अनंता अनंता म्हणोन । धरणीवरी पडियेला ॥ १२७ ॥

इतुकिया अवसरीं । वृद्धब्राह्मण-वेषधारी ।
जवळी आला परिकरीं । उठीं उठीं म्हणतसे ॥ १२८ ॥

काय विप्रा पुसतोसी । श्रीमदनंत कोठें आहे विचारिसी ।
दाखवीन चाल आम्हांसरसीं । म्हणोनि धरिला उजवा कर ॥ १२९ ॥

उठवोनि कौंडिण्यासी । घेऊनि जातां अरण्यासी ।
नगरी जाहली पूर्वील जैसी । महदाश्र्चर्य पाहतसे ॥ १३० ॥

घेऊनि गेला नगरांत । सिंहासन रत्नखचित ।
नेऊनि तेथें बैसवीत । अपण दाखवी निजरुप ॥ १३१ ॥

रुप देखोनि कौंडिण्य । स्तोत्र करी अतिगहन ।
चरणीं माथा ठेवून । विनवीतसे कर जोडुनी ॥ १३२ ॥

” नमो नमस्ते गोविंदा । श्रीवत्सला चिदानंदा ।
तुझे स्मरणमात्रें दुःखमदा । हरोनि जातीं सर्व पापें ॥ १३३ ॥

तूं वरेण्य यज्ञपुरुष । ब्रह्मा-विष्णु-महेश ।
तुझे दर्शनमात्रें समस्त दोष । हरोनि जातीं तात्काळीं ॥ १३४ ॥

नमो नमस्ते वैकुंठवासी । नारायणा लक्ष्मीविलासी ।
जगद्व्यापी प्रतिपाळिसी । अनंतकोटि-ब्रह्मांडनायका ॥ १३५ ॥

पापी आपण पापकर्मीं । नेणों तुझी भक्तिधर्मीं ।
पापात्मा पापसंभव आम्ही । क्षमा करीं गा दातारा ॥ १३६ ॥

तुजवांचोनि आपण । अन्यथा दैवत नेणें ।
याचि कारणें धरिले चरण । शरणागत मी तुझा ॥ १३७ ॥

आजि माझा जन्म सफळ । धन्य माझें जीवन केवळ ।
तुझें देखिलें चरणकमळ । भ्रमर होवोनि वास घेतों ” ॥ १३८ ॥

ऐसें स्तविलें कौंडिण्यांनीं । ऐकोनि प्रसन्न झाला त्तक्षणीं ।
भक्तजना चिंतामणि । वरत्रय देता झाला ॥ १३९ ॥

धर्मप्राप्ति दरिद्रनाशन । शाश्र्वत वैकुंठभुवन ।
ऐसा वर दिधला नारायणें । ऐक युधिष्ठिरा कृष्ण म्हणे ॥ १४० ॥

पुनरपि द्विज विनवी देखा । म्या देखिलें आश्र्चर्य एका ।
अरण्यांत वृक्ष एक । महाफलित आम्र असे ॥ १४१ ॥

त्याचें फळ पक्षिजाती । कोणी प्राणी नातळती ।
पुढें येतां मागुती । देखिली धरनु सवत्स ॥ १४२ ॥

तृण असे तेथें प्रबळ । त्यांचे तोंडा नये केवळ ।
आणिक देखिली निर्मळ । सरोवरें दोनी तेथें ॥ १४३ ॥

अन्योन्यें एकमेकां । मिळालें होतें तेथें उदक ।
पुढें पाहे अपूर्व एक । वृषभ एक मनोहर ॥ १४४ ॥

त्याचे मुखा न ये ग्रास । सर्वकाळीं वनवास ।
पुढें देखिला सुरस । कुंजर एक मदोन्मत्त ॥ १४५ ॥

सवें एक गर्दभासी । देखिलें स्वामी मार्गेंसी ।
पुढें येतां संधीसी । देखिला वृद्ध ब्राह्मण ॥ १४६ ॥

न कळें याचा अभिप्रावो । विस्तारोनि निरोपावा ।
जगन्नाथा केशवा । म्हणोनि चरणीं लागला ॥ १४७ ॥

कृपानिधि नारायण । सांगतसे विस्तारोन ।
ऐक भक्ता कौंडिण्य । वृक्ष तुवां देखिला ॥ १४८ ॥

पूर्वीं होता द्विजवर । त्यासी येती वेदशास्त्र ।
उन्मत्तपणें गर्वें थोर । शिष्यवर्गा न सांगेचि ॥ १४९ ॥

त्या पापास्तव वृक्ष झाला । तुवां धेनुसी देखिलें ।
पूर्वीं भूमि निष्फला । दिली होती ब्राह्मणासी ॥ १५० ॥

देखिला तुवां वृषभ एक । पूर्वीं विप्र महाधनिक ।
केलें नाहीं दानादिक । त्याणें पापें ऐशी गति ॥ १५१ ॥

सरोवरें तुवां दोनी । देखिलीं म्हणसी नयनीं ।
पूर्वीं होत्या दोघी बहिणी । घेतलें दान आपणांत ॥ १५२ ॥

खर म्हणजे तुझा क्रोध । कुंजर तोचि मदांध ।
जहालें तुझें मन शुद्ध । भेटलों ब्राह्मण आपणचि ॥ १५३ ॥

जें जें तुवां देखिलें । त्या समस्तां मुक्ति दिल्हें ।
अखिल ऐश्र्वर्य भोगीं वहिलें । अंती जाय स्वर्गासी ॥ १५४ ॥

तुवां करीं वो तेथें वासु । नक्षत्रांत पूनर्वसु ।
ऐसा वर देतां हर्षु । जाहला तया कौंडिण्या ॥ १५५ ॥

ऐसा वर लाधोनि । राज्य केलें बहुदिनीं ।
अंतीं गेला स्वर्गभुवनीं । ऐक राया युधिष्ठिरा ॥ १५६ ॥

ऐेसी कथा धर्मासी । सांगितली तैं हृषीकेशी ।
आचरिलें भक्तींसीं । अनंतव्रत तये वेळीं ॥ १५७ ॥

श्रीगुरु म्हणती द्विजासी । सांगती व्रत हृषीकेशी ।
आचरितां तत्क्षणेसीं । राज्यपद पावले ॥ १५८ ॥

आणिक हेंचि भूमीवरी । व्रत केलें ऋषश्र्वरीं ।
आचरावें नरनारीं । लाधे चारी पुरुषार्थ ॥ १५९ ॥

व्रतांमध्ये थोर व्रत । प्रख्यात असे अनंत ।
तुवां बांधावें सतत । तुझ्या जेष्ठ सुतासी ॥ १६० ॥

व्रत कौंडिण्य आचरला । अखिल सौख्य लाधला ।
आचरावें या व्रताला । अनंत पुण्य असे जाणा ॥ १६१ ॥

तुमचें गोत्र कौंडिण्य । करितां जोडेल बहु पुण्य ।
आमुचा निरोप कारण । व्रत तुम्हीं करावें ॥ १६२ ॥

ऐसें श्रीगुरुनिरोपेंसीं । व्रत केलें संतोषीं ।
पूजा केली श्रीगुरुसी । नानापरी अवधारा ॥ १६३ ॥

नीरांजन बहुवसीं । गीत नृत्य वाद्येंसी ।
पूजा करिती श्रीगुरुसी । भक्तिभावें करोनियां ॥ १६४ ॥

आराधना ब्राह्मणांसी । भोजन करविती श्रीगुरुसी ।
आनंद झाला बहुवसीं । श्रीगुरुमूर्ति संतोषले ॥ १६५ ॥

येणेंपरी श्रीगुरुसी । आराधोनि संतोषी ।
गेला आपुले ग्रामासी । ऐक शिष्या एकचित्तें ॥ १६६ ॥

विप्र जो कां सायंदेवो । कलत्रपुत्र पाठवी ठावो ।
मागुती आला आपण पहा हो । श्रीगुरुचरणसेवेसी ॥ १६७ ॥

राहोनियां श्रीगुरुपाशीं । सेवा केली बहुवसीं ।
ऐसें तुझे पूर्वजासी । प्रसन्न झाले श्रीगुरु ॥ १६८ ॥

सिद्ध म्हणे शिष्यासी । येणेंपरी तुम्हांसी ।
निधान लावला परियेसीं । श्रीनृसिंहसरस्वती गुरु ॥ १६९ ॥

म्हणोनि सरस्वती-गंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार ।
ऐकतां होय मनोहर । लाधे चारी पुरुषार्थ ॥ १७० ॥

॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे
श्रीमदनंतव्रतमहिमावर्णनं नाम द्विचत्वारिंशोऽध्यायः ॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

Leave a Reply